मुंबई : भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अपशब्द वापरल्यानंतर शिवसैनिक संतप्त झाले आहेत. युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली युवा सैनिकांनी राणेंच्या जुहू येथील बंगल्याबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे जुहू परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. वरुण सरदेसाई यांनी या पूर्वीही राणे पिता-पुत्रांविरोधात रणशिंग फुंकले होते. आताही सरदेसाई राणे कुटुंबीयांविरोधात रस्त्यावर उतरले आहेत.
वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे कार्यकर्ते नारायण राणे यांच्या जुहूतील निवासस्थानी जमले होते. यावेळी वरुण सरदेसाई यांनी आक्रमक शैलीत राणे कुटुंबीयांना आव्हान दिले. नितेश राणे यांनी आम्हाला इकडे येऊन दाखवा, असे आव्हान दिले होते. आम्ही उंदराच्या बिळासमोर आलो आहोत. पण त्यांनी काय केलं?, असा सवाल विचारत वरुण सरदेसाईंनी नितेश राणे यांना प्रतिआव्हान दिले.
भाजपचे कार्यकर्ते आमच्यावर दगडफेक करत आहेत. मात्र, पोलीस आमच्यावर लाठीमार करत आहेत. उद्धव ठाकरे आमचे दैवत आहेत. त्यांच्यासाठी आम्ही एक काय हजार लाठ्या खाऊ. भाजपच्या बांडगुळांना पळवून लावू, असे वरुण सरदेसाई यांनी म्हटले
वरुण सरदेसाई यांच्याकडे युवासेनेच्या सचिव पदाची जबाबदारी आहे. ते पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ लागतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या भगिनीचे ते पुत्र आहेत. वरुण यांच्याकडे युवासेनेच्या सचिवपदासह शिवसेनेच्या आयटी सेलचीही जबाबदारी आहे. वरुण सरदेसाई हे पेशाने सिव्हिल इंजिनिअर आहेत.
आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी जाहीर मागणी सर्वप्रथम वरुण यांनीच केली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी वरुण सरदेसाई हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या नियोजनात वरुण सरदेसाई यांचा मोठा सहभाग होता. २०१७ मधील कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीतही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदेंसाठी त्यांनी प्रचार केला होता. विशेष म्हणजे वरुण सरदेसाई गेल्या वेळी विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यताही वर्तवली जात होती. गेल्या वेळी मुंबई सिनेट निवडणुकीच्या युवासेनेच्या व्यूहरचनेत वरुण सरदेसाई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सर्व १० जागा जिंकून युवासेनेने विक्रम रचला होता.
नितेश राणे यांनी डिवचले होते
नितेश राणे यांनी मंगळवारी सकाळी एक ट्विट केले होते. माझ्या कानावर आलेल्या माहितीनुसार, युवासेनेचे कार्यकर्ते आमच्या जुहू निवासस्थानाबाहेर जमणार आहेत. त्यामुळे एकतर मुंबई पोलिसांनी शिवसैनिकांना रोखावे. अन्यथा पुढे काय घडले त्यासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवायची हिंमत करु नका. आम्ही तुमची वाट बघतोय, अशा शब्दांत नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचले होते.