एसटी कर्मचारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर

मुंबई : राज्यातील एसटी कर्मचारी मध्यरात्रीपासुन बेमुदत संपावर आहेत. दिवाळी आणि सणासुदीच्या दिवस जवळ असताना एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असल्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा दसरा आणि दिवाळी गोड करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले होते. परंतु एसटी कर्मचाऱ्यांना संपावर जाण्याची वेळ आली आहे. सर्व एसटी कर्मचारी मंत्रालयाकडे एसटी घेऊन येणार असून जर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली तर परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दालनात ठाण मांडून आंदोलन करण्यात येईल असा इशार भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना वेतन आणि एसटीचे विलिनीकरण राज्य सरकारमध्ये करण्यात येत नाही तोपर्यंत एसटी कर्मचारी संपावर जाणार असल्याची माहिती भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. कर्मचारी आपल्या पत्नीचे दागिने गहाण ठेवून एसटी मंत्रालयाच्या दिशेने आणार आहेत. मुंबईत चक्काजाम करणार असल्याचा इशारा पडळकर यांनी दिला आहे.
पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, एसटीचे विलिनीकरण जर राज्य सरकामध्ये केलं नाही तर महाराष्ट्रातले जे एसटी कर्मचारी आहेत ते स्वतःच्या पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेऊन एसटीमध्ये इंधन भरतील आणि या सगळ्या एसटी मंत्रालयाकडे नेतील मुंबईतील चक्काजाम करुन टाकतील. जर पोलिसांचा फोर्स वापरला तर जिथे पोलीस अडवतील तिथे एसटी सोडतील पण एसटी कर्मचारी आता गप्प बसणार नाही. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत एसटी कर्मचारी संपावर जात आहेत. याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पडळकर पुढे म्हणाले, काही दिवसांपुर्वीच सांगितले होते की, दसरा दिवाळी तोंडावर आली आहे त्यामुळे तुम्ही योग्य निर्णय कर्मचाऱ्यांच्याबाबत घ्या. एसटी कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय सुरु आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे जे धोरण आहे किमान काम किमान वेतन पण राज्य सरकार दाम देत नाही. सातवे वेतन आल्यावरही एसटी कर्मचाऱ्यांना फायदा दिला नाही यामुळे सगळे कर्मचारी आक्रमक झाले आहेत. राज्यातील एसटी कर्मचारी बेमुदत संपावर जात असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार असा इशारा पडळकर यांनी दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याची धमकी दिली. त्यांना कामावरुन काढले तर परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दालनात ठाण मांडणार असल्याचा इशारा पडळकर यांनी दिला आहे.