
मोहाली : भारत आणि श्रीलंका याच्यातील पहिला कसोटी सामना मोहाली येथे सुरु आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंकेची पहिल्या डावात ४ बाद १०८ धावा अशी अवस्था असताना खेळ थांबवण्यात आला. भारताने पहिला डाव ८ बाद ५७४ धावांवर घोषित केला होता. त्यामुळे भारताला ४६६ धावांची आघाडी मिळाली आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकेचे उर्वरित ६ गडी लवकर बाद करुन प्रतिस्पर्ध्यांना फॉलोऑन देण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.
आयएस बिंद्रा पीसीए स्टेडियमवर शनिवारी श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने धावांचा डोंगर रचला आहे. रवींद्र जडेजाच्या झुंझार शतकी खेळीने श्रीलंकन गोलंदाजांचे अक्षरशः दमछाक उडाली. भारताच्या वतीने खेळताना मयंक अग्रवाल ३३ व रोहित शर्माने २९ धावा करीत पहिल्या दिवसाची सुरूवात केली होती. त्यानंतर हनुमा विहारीने अर्धशतक ठोकून सर्वांची वाहवा मिळवली. त्याने ५८ धावा काढल्या. आपला शंभरावा सामना खेळणाऱ्या विराट कोहलीने दमदार सुरूवात केली , परंतु अर्ध शतकाच्या उंबरठ्यावर असताना तो ४५ धावावर बाद झाला. त्यानंतर ऋषभ पंतने तडाखेबंद फलंदाजी केली. परंतु अखेरच्या क्षणी त्याला शतकाने हुलकावणी दिली. ऋषभ ९६ धावावर बाद झाला. श्रेयस अय्यरने २७ धावा केल्या.सामन्याचा दुसरा दिवस संस्मरणीय बनवला तो रवींद्र जडेजाने. जडेजा नाबाद १७५ धावा काढून भारताचा डावाला मजबूत बनवले आहे. अखेरच्या क्षणी त्याला मोहम्मद
शामीने नाबाद २० धावा काढून चांगली साथ दिली.
सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला भारतीय संघाचे आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा मैदानात फलंदाजीसाठी उतरले. दोघांनीही चांगला खेळ खेळत शतकी भागिदारी केली. मात्र श्रीलंकन गोलंदाज कमलच्या चेंडूवर अश्विन झेलबाद झाला. त्याने ८२ चेंडूंमध्ये आठ चौकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या. तर दुसरीकडे जडेजाने मैदानावर घट्ट पाय रोवून श्रीलंकन टीमला जेरीस आणले. जडेजाने २२८ चेंडूमध्ये तब्बल १७ चौकार आणि ३ षटकार यांच्या मदतीने १७५ धावा केल्या. पुढे जयंत यादवच्या रुपाने भारताला आठवा धक्का बसला. फर्नांडोच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. यादवने फक्त दोन धावा केल्या. मात्र पुढे मोहम्मद शामीने जडेजाला चांगली साथ दिली. शामीच्या मदतीमुळेच भारतीय धावफलक थेट ५७८ वर पोहोचला. शेवटी भारताने आपला डाव घोषित केल्यामुळे मोहम्मद शमी आणि जडेजा नाबाद राहिले. जडेजाने कसोटी सामन्यातील आपले दुसरे शतक झळकावले.
दुसरीकडे श्रीलंकन संघातील कमल, विश्वा फर्नांडो, एम्बुल्डेनिया या गोलंदाजांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. तर लाहिरी कुमरा आणि धनंजय सिल्वा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. श्रीलंकन गोलंदाजांपैकी एम्बुल्डेनियाने एकूण ४६ षटके टाकून १८८ धावा दिल्या. तर विश्वा फेर्नांडोने २६ षटकांमध्ये भारतीय संघाला १३५ धावा दिल्या.
श्रीलंकेचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. सलामीला आलेल्या दिमुथ करुणरत्ने आणि लाहिरु थिरीमने यांनी सुरूवात चांगली केली असताना ४८ धावावर पहिला गडी बाद झाला. लाहिरु थिरीमने याने १७ धावा केल्या तर दिमुथ करुणरत्ने २८ धावावर तंबूत परतला. त्यानंतर आलेल्या अँजेलो मॅथ्यूज २२ धावावर बाद झाला. धनंजय डिसिल्वाही केवळ १ धावावर परतला. अशा प्रकारे श्रीलंकेचा पहिला डाव डळमळला असून ४ बाद १०८ धावा संघाने केल्या आहेत.
जडेजाने मोडला कपिल देव यांचा १९८६ सालचा विक्रम
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने नेत्रदीपक कामगिरी केली. त्याची धमाकेदार फलंदाजी आणि मैदानावरील रुबाब क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर करुन गेलाय. त्याने २२८ चेंडूंमध्ये नाबाद १७५ धावांची खेळी करत भारताचा धावफलक थेट ५७८ पर्यंत नेऊन पोहोचवला. जडेजाच्या या कामगिरीचे कौतुक होत आहेच. मात्र त्याने माजी क्रिकेटपटू कपिल देव यांचा १९८६ सालचा एक विक्रम मोडला आहे. सातव्या क्रमांकावर येऊन सर्वाधिक धावा करण्याचा कपिल देव यांचा १९८६ सालचा रेकॉर्ड जडेजाने मोडलाय. जडेजाने सातव्या क्रमांकवर फलंदाजीसाठी येऊन तब्बल १७५ धावा केल्या आहेत. जडेजा आणि कपिल देव यांच्याव्यतिरिक्त सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येऊन १५० पेक्षा जास्त धावा करणाऱ्यांच्या रांगेमंध्ये ऋषभ पंतचेदेखील नाव आहे. ऋषभने १५९ धावा केलेल्या आहेत. तर कपिल देव यांनी १९८६ च्या डिसेंबरमध्ये श्रीलंकेविरुद्ध कानपूरमध्ये खेळताना १६३ धावा केल्या होत्या.