…तर मुख्य प्रवाहात या; संभाजीराजेंचे नक्षलवाद्यांना प्रतिआवाहन

पुणे : गडचिरोलीतील नक्षलवाद्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देणारे पत्रक काढत मराठा समाजाला त्यांच्यासोबत सामील होण्याचं आवाहन केलं आहे. या आवाहनाला खासदार संभाजीराजे यांनी पत्रक काढत नक्षलवाद्यांनाच प्रतिआवाहन केलं आहे. मराठा समाजासाठी सहानुभूती दाखवल्याबद्दल मी तुमचा आदर करतो. पण तुम्ही शिवबांचे खरे वैचारिक वारसदार असाल तर मुख्य प्रवाहात सामील व्हा, असं आवाहन संभाजीराजे यांनी नक्षलवाद्यांना केलं आहे.
राज्यात मराठा आरक्षणावरून राजकारण तापलं आहे. अशातच नक्षलवाद्यांनी पत्रक काढत मराठा समाजाला आवाहन केलं. तसंच दलाल नेत्यांपासून सावध व्हा, असं नक्षलवाद्यांनी म्हटलं आहे. नक्षवाद्यांच्या पत्राला संभाजीराजे यांनी पत्रक काढत प्रतिआवाहन केलं आहे. मराठा समाजाला नक्षलवाद्यांनी भावनिक पत्रक काढून आवाहन केलं होतं. त्या सर्व नक्षल संघटनांना प्रती आवाहन करून छत्रपती संभाजीराजे यांनी सुद्धा भावनिक आवाहन केलं आहे. छत्रपती शिवरायांचा वंशज आणि मराठा समाजाचा घटक या नात्याने संभाजीराजेंनी नक्षलवाद्यांनाच लोकशाहीचे मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देऊन मराठा समाजाला भुरळ पाडण्याचा प्रयत्न नक्षलवादी संघटना करत असल्याचे मला वाचनात आले. ‘मराठ्यांनो, आम्ही तुमची वाट पाहत आहोत’ असेही ते म्हणाले. उलट मराठा समाजाचा घटक किंवा त्याच स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज या नात्याने, मी त्यांनाच आवाहन करतो. “नक्षल वाद्यांनो या आम्हीच तुमची वाट पाहत आहोत. या सामील व्हा मुख्य प्रवाहात. भारताने लोकशाही व्यवस्था स्वीकारली आहे.
शिवाजी महाराजांचा राज्यकारभार बारकाईने पाहिला, तर अष्टप्रधान मंडळ स्थापून, त्यांनी लोकशाहीचेच बीजारोपण केले होते. त्यांचेच 9 वे वंशज राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी one of the pillar of Indian Democracy असे संबोधित केले होते. त्यांचा रक्ताचा आणि वैचारिक वारसदार या नात्याने मी आपल्याला आवाहन करू इच्छितो, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या नागरिकांच्या, इथल्या हजारो वर्षांच्या संस्कृतीला अनुसरूनच भारतात लोकशाही राज्य व्यवस्था लागू केली. तुम्ही सुद्धा तिचे पाईक व्हा.
मराठा समाजाने शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत भूमिका निभावली होतीच. त्यांच्या नंतर सुद्धा परकीय शक्तींचा पाडाव करण्यासाठी मराठा समाजाने आपले सातत्याने बलिदान दिलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आदर्श देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा कायम ठेवला आहे. आजही मराठा समाज ह्या लोकशाहीचे रक्षण करण्यास सर्वात पुढे आहे. महाराष्ट्राचे हे सह्याद्री पुत्र हिमालयाचे रक्षण करण्यासाठी आपल्या छातीचा कोट करून सीमेवर उभे आहेत.
मला मान्य आहे, की स्वातंत्र्यानंतर मराठा समाजावर अन्याय झाला आहे. त्याबाबत आम्ही याच लोकशाही व्यवस्थेत लोकशाही मार्गानेच आमचे हक्क मागत आहोत. न्यालयीन लढाई, आंदोलने, मोर्चे, चर्चा, लाँग मार्च इ. मार्ग आम्ही स्विकारत आहोत. अवघ्या जगाने आमच्या मूक मोर्चाच्यांची दखल घेतली होती. शिवाजी महाराजांचे स्वराज्य अठरा पगड जाती, बारा बलुतेदार यांचे होते. यापुढेही सर्वांना सोबत घेऊन आम्ही पुढे जाऊ. आम्हाला विश्वास आहे की आम्ही आरक्षणही मिळवू आणि समाजाचे इतर प्रश्नही सोडवू. माझी परत एकदा नक्षल बंधूंना विनंती आहे. आपण मराठा समाजाबद्दल जी सहानुभूती दाखवली, त्याबद्दल तुमचा आदरच करतो. परंतु, जर का तुम्ही शिवबांचे खरोखर वैचारिक पाईक असाल तर आपण मुख्य प्रवाहात या.
कुठलीच व्यवस्था परिपूर्ण नसते, तिच्यात उणीवा असणारच. लोकशाही बाबत पण काहींचे वेगळे मत असू शकतात. परंतु जगभरात आज ती व्यवस्था स्वीकारली गेली आहे. भारताने सुद्धा तिचा यशस्वी स्वीकार केला, यशस्वी वाटचाल सुद्धा करत आलो आहोत. काही उणीवा आजही असतील पण आपण त्यामध्ये सुधार करण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. क्रांतीचा विचार हा चांगलाच आहे. पण तो विधायक मार्गाने जाणारा असावा. तो विधायक मार्गाने सुद्धा घेऊन जाता येतो. काही लोक या लोकशाही व्यवस्थेत चांगले नसतीलही, पण म्हणून संपूर्ण व्यवस्थाच कुचकामी आहे, असे नसते. लोकांना शिक्षित करून, चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव करून देऊन मत पेटीच्या साहाय्याने पर्याय उभा करून देण्यातच संपूर्ण राष्ट्राची भलाई आहे.