शिवसेना खासदाराने भुजबळांचा बाप काढला, राष्ट्रवादीला बुडविण्याची भाषा केली!

परभणी: जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या नियुक्तीवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील वाद समोर आला आहे. गोयल यांच्या नियुक्तीवरून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट संघर्ष पेटला असून शिवसेना खासदार संजय जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गरज पडल्यावर माकडीणही तिच्या पिल्लाला बुडवते. आम्हीही राष्ट्रवादीला बुडवू, असं खळबळजनक विधान शिवसेना खासदार संजय जाधव यांनी केलं आहे. आमचं तेवढं उघडं करतात. आता पाणी वर जाऊ लागले आहे, अशा शब्दांत जाधव यांनी संताप व्यक्त केला. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना जाधव यांनी हे विधान केलं. त्यांच्या या विधानाची जिल्ह्यात चर्चा आहे. परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या एका स्फोटक व्हिडीओ क्लिपने राष्ट्रवादी-शिवसेनेतला संघर्ष अधोरेकित झालाय. एका मेळाव्यात खासदार संजय जाधव बोलत असताना ते राष्ट्रवादीवर असे काही घसरले की त्यांनी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचाही बाप काढला.
कुठल्याशा एका प्रकरणावर बोलताना संजय जाधवांनी छगन भुजबळांवर हल्ला चढवला. कमिशनरने आदेश देऊनही भुजबळांनी विरोधात पत्र लिहिलं, जशी याच्या बापाची जहागिर होती, असं म्हणत त्यांनी आपल्या मनातील संताप व्यक्त केला. हा संताप व्यक्त करताना त्यांच्या मनात राष्ट्रवादीबाबत किती राग आहे, याची झलक त्यांनी आपल्या भाषणात दाखवली.
एका प्रकरणात आम्ही प्रतिष्ठा पणाला लावली… कमिशनरपर्यंत तक्रारी केल्या. कमिशनरने आदेश दिले, दुकानदाराला दुकान बहाल करा आणि त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा…. एवढं असतानाही भुजबळ साहेबांनी एक पत्र दिलं अन् याचं तात्पुरतं दुकान दुसऱ्याला जोडा, असं सांगितलं…. जसं काय याच्या बापाची जहागिरीच आहे, असा एकेरी हल्ला त्यांनी भुजबळांवर चढवला.
आमच्याही भावना अनावर होतात हे लक्षात ठेवा. शेवटी काही मर्यादा असतात. कुठपर्यंत शांत बसायचं, कुठ पर्यंत सहन करायचं. जेव्हा माकडीण सुद्धा स्वत:ला बुडायची वेळ आल्यावर लेकराला पाया खाली घालते हे लक्षात ठेवा. तर राष्ट्रवादीला आम्ही केव्हाही पायाखाली घालू शकतो हे तुम्हाला सांगतो, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीला थेट इशाराच दिला.
आम्ही आता सहनशीलतेच्या पलीकडे गेलोय. परभणी जिल्ह्यात कलेक्टर बदलायचा होता. मी फक्त मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली. राष्ट्रवादीने एवढं रान पेटवलं जसा मी काय मोठा अपराधच केलाय…. तुमचं सगळं जमतं…. म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं बघायचं वाकून…. अशी अवस्था राष्ट्रवादीवाल्यांची आहे. तरी देखील मुख्यमंत्र्यांचा आदेश आम्ही शिरसावंद्य मानला. जो काही आदेश येईल तो मान्य केला. पण प्रत्येक गोष्टीत सध्या खाजवाखाजवी सुरु आहे, असं सांगत जाधव यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेतला वाद किती टोकाला पोहोचलाय, याची जाणीव करुन दिली. मात्र पक्षीय कुरघोडीवर बोलताना भुजबळांचा बाप काढून त्यांचा तोल सुटलेला पाहायला मिळाला.