पुणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना ८० जागा लढविणार; खा. संजय राऊतांची घोषणा

पुणे: शिवसेना पक्षाकडून पुण्यातील संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. पुणे महानगरपालिकेची आगामी निवडणूक महाविकास आघाडीने एकत्र लढवली तरी शिवसेना ८० जागांवर लढवेल, अशी घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली.
ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना किंग आणि किंगमेकर यापैकी एक नक्कीच असणार. पुण्याकडे आमचं लक्ष आहे, असे सांगून राऊत म्हणाले की, सध्या शिवसेना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी संघटनात्मक काम करत आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जनमानसातील प्रतिमा दिवसेंदिवस उंचावत आहे. त्यामुळे पुण्यातील आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या एकेरी राहणार नाही.
शरद पवार यांच्यावर टीका करणे आजकाल फॅशन झाली आहे. चंद्रकांत पाटील म्हणजे वसंतदादा पाटील नव्हेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
खेडमधील राष्ट्रवादी आणि शिवसेना वादावरही संजय राऊत यांनी भाष्य केले. सत्ता असली किंवा नसो आमच्यासाठी शिवसेना महत्त्वाची आहे. त्यामुळे जिथे शिवसेनेवर अन्याय होईल, तिथे आम्ही उभे राहणारच, असे राऊत यांनी सांगितले.