राजकारण

नितेश राणेंच्या ‘म्याव म्याव’वर शिवसेनेकडून पलटवार

मुंबई : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस कॉपी आणि माफीने गाजला. आ. भास्कर जाधव यांनी मोदींची केलेली नक्कल पहिल्या दिवशी चर्चेत होती. त्यानंतर, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आदित्य ठाकरेंची एंट्री होताना आमदार नितेश राणेंनी त्यांची उडवलेली खिल्ली महाराष्ट्रभर व्हायरल झाली.

राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे दुसऱ्या दिवशी सभागृहात जात असताना आमदार नितेश राणे हे विधानसभेच्या पायऱ्यावर इतर भाजप सदस्यांसमेवत बसले होते. त्यावेळी, नेमकं आदित्य ठाकरे पायरी चढून वर जात असताना, नितेश राणेंनी त्यांच्याकडे पाहून म्याव, म्याव… असा आवाज काढला. नितेश राणेंच्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे. आता, राणेंच्या या व्हिडिओला पाहिल्यानंतर शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलंय.

शिवसेनेचे विधान परिषद आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी ट्विट करुन राणेंना टोला लगावला आहे. मांजर आडव गेले तरी थांबू नये, ही प्रबोधनकारांची थोर शिकवण महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तंतोतंत पाळली!, असे ट्विट कायंदे यांनी केलं आहे. त्यासोबतच, म्याव.. म्याव… हा हॅशटॅगही त्यांनी वापरला. नितेश राणेंच्या कृत्यावर शिवसेनेकडून अद्याप प्रत्युत्तर देण्यात आलं नव्हतं. मात्र, मनीषा कायंदे यांनी ट्विट करुन राणेंवर पलटवार केला आहे.

म्हणून म्याव म्याव केलं : नितेश राणे

विधिमंडळातील सदर कृत्यानंतर नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना यावर स्पष्टीकरण दिलं आहे. हो, मी आदित्य ठाकरे यांना पाहून म्याव, म्याव केलं. कारण आधी वाघाची डरकाळी देणाऱ्या शिवसेनेची अवस्थाच म्याव, म्याव सारखी झाली आहे, असं नितेश राणे यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button