राजकारण

गृहमंत्री अनिल देशमुखांच्या कार्यक्षमतेवर शिवसेनेचा सवाल

नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते!

मुंबई : अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा व रुबाब आहे. दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळ्यात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलीस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो. अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावे. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशांचे जाहीर आदेश देणे बरे नाही. ‘सौ सोनार की एक लोहार की’ असे वर्तन गृहमंत्र्यांचे असायला हवे. पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होतो हे विसरून कसे चालेल?, असं म्हणत शिवसेनेचे नेते, खा. संजय राऊत यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर चांगलाच निशाणा साधला आहे.

‘सामना’तील रोखठोक सदरातून राऊत यांनी मुंबईत स्फोटकांनी सापडलेली कार, सचिन वाझे अटक आणि मनसुख हिरेन प्रकरणावरही परखड भाष्य केले आहे. यावेळी ते म्हणाले, ‘महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला ठाकरे यांचे सरकार पाडण्याची घाई झाली आहे. त्यामुळे फाटक्या फुग्यात हवा भरण्याचे काम ते करीत आहेत. त्यांचे आरोप सुरुवातीला जोरदार वाटतात. नंतर ते खोटे ठरतात. सचिन वाझे हे आता रहस्यमय प्रकरण झाले. पोलीस आयुक्त, गृहमंत्री, मंत्रिमंडळातील प्रमुख लोक यांचा लाडका व भरवशाचा असा हा वाझे फक्त साधा सहाय्यक पोलीस निरीक्षक होता. त्याला मुंबई पोलिसांचे अमर्याद अधिकार कोणाच्या आदेशाने दिले हा खऱ्या चौकशीचा विषय आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयात बसून वाझे वसुली करीत होता तर गृहमंत्र्यांकडे याबाबत माहिती का नसावी? असा प्रश्नही राऊत यांनी विचारला.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अँटिलिया स्फोटकं, मनसुख हिरेन हत्या आणि सचिन वाझे या प्रकरणांवरून चांगलेच वाद-विवाद आणि चर्चा सुरू आहे. यामध्येच रमबीर सिंह यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एकच धुरळा उडाल्याचे चित्र आहे. दरम्यान गृहमंत्र्यांनी वाझेंना १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग करतात. त्या आरोपांचा सामना करायला सुरुवातीला कुणीच पुढे आले नाही! सरकारकडे ‘डॅमेज कंट्रोल’ची योजना नाही हे पुन्हा दिसले, असे स्पष्ट मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

‘रश्मी शुक्ला व सुबोध जयस्वाल या बडय़ा अधिकाऱ्यांनी पोलीस खात्यातील काही बदल्यांसंदर्भात व्यवहार होत असल्याची माहिती मिळताच यासंदर्भातील दलालांचे फोन टॅप केले. त्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांना दिला. हे फोन टॅपिंग व त्यातून मिळालेली माहिती हे गौडबंगाल आहे. मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून हे फोन टॅपिंग झाले. पण या संभाषणात ज्या अधिकाऱ्यांची नावे आली त्यातील एकाही अधिकाऱ्यांची बदली संभाषणात ऐकू येते त्याप्रमाणे झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे बदल्यांत भ्रष्टाचार हा आरोप खोटा! या खोट्या माहितीचा अहवाल घेऊन आपले विरोधी पक्षनेते फडणवीस हे दिल्लीत आले. केंद्रीय गृह सचिवांना भेटले व सीबीआय चौकशीची मागणी केली. हा प्रकार हास्यास्पद आहे’, असे म्हणत संजय राऊतांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button