अफवा पसरविणाऱ्या शिवसेना मंत्र्याची पोलीस महासंचालकांच्या खुलाशानंतर बोलती बंद!

मुंबई : राज्यात आलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळासोबत सोमवारी सकाळी आणखी एका राजकीय वादळ घोंगावत होते. राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे हे अचानक सुट्टीवर गेल्यामुळे राजकीय वर्तुळात याची वेगळीच चर्चा रंगत होती. मात्र, स्वतः संजय पांडे यांनी ‘मी चंदीगडला कुटुंबाला भेटण्यासाठी दोन दिवसांची सुट्टी घेऊन आलो आहे आणि याबाबत गृहमंत्री आणि अतिरिक्त मुख्य सचिव यांना अगोदरच याबाबतची सूचना दिली होती’, स्पष्ट केल्यानंतर या चर्चेला विराम मिळाला.
राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर पोलीस निरीक्षक अनुप डांगे आणि भीमराव घाडगे यांनी लावण्यात आलेल्या आरोप प्रकारची चौकशी संजय पांडे यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र, परमबीर सिंह यांनी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा कॉल रेकॉर्डिंग करून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर मात्र संजय पांडे यांनी परमबीर सिंह याची चौकशी करण्यास असमर्थता दाखवली होती. त्याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून तसे कळवले होते. पांडे हे या प्रकरणातून बाहेर पडल्यानंतर मुख्यमंत्री नाराज असल्याच्या वावड्या राजकीय क्षेत्रात उडाल्या होत्या. सोमवारी सुद्धा ते दोन दिवस रजेवर गेल्याने शिवसेनेच्या एका मंत्र्याकडून पांडे न सांगता गेल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या.
याबाबत दोन दिवसांपूर्वीच पांडे यांनी अतिरिक्त मुख्य सचिव आणि गृहमंत्री दोन दिवसांच्या सुट्टीवर जाण्याबाबत चर्चा केली होती. त्यांना सुट्टीवर जाण्याची परवानगी देखील देण्यात आली. मात्र, त्यांना रविवारपर्यंत थांबण्यास सांगण्यात आले होते. रविवारी बैठका आटोपून पांडे हे सायंकाळी विमानाने चंदीगड येथे दाखल झाले.चंदीगड येथे पांडे यांच्या पत्नी राहत असून त्यांचा मुलगा अमेरिकेत राहण्यास आहे. पत्नीची तब्येत बरी नसल्यामुळे पांडे यांना पत्नीला भेटण्यासाठी चंदीगडला जावे लागले. पांडे सोमवारी पुन्हा मुंबईला येणार होते. मात्र, चक्रीवादळामुळे विमानसेवा बंद असल्यामुळे त्यांना सोमवारी येणे शक्य झाले नाही. माझ्या नाराजीचा प्रश्नच येत नाही. कुटुंबाला भेटण्यासाठी चंदीगड येथे जाण्याचे अगोदरच ठरले होते. तसे संबंधिताना कळवले होते. माझ्याविषयी वावड्या का उठवल्या जात आहेत, याचे मला आश्चर्य वाटते. याकडे संजय पांडे यांनी लक्ष वेधले आहे.