राजकारण

सोलापूरच्या पालकमंत्र्यांवर शिवसेना नेत्यांचा संताप

सोलापूर : राज्यमंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एका कार्यक्रमात बोलण्याच्या ओघात केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. एका उद्यानाच्या कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात ‘मुख्यमंत्र्याचं मरू द्या, जाऊ द्या’ असं भरणे यांनी म्हटलं. त्यानंतर, सोलापुरातील शिवसैनिकांनी सोशल मीडियातून तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिवसैनिकांचा रोष पाहता भरणे यांनीदेखील तात्काळ दिलगिरी व्यक्त करत स्पष्टीकरणही दिले आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं त्यांनी सांगितलं.

सोलापूरातील एका कार्यक्रमात आनंद चंदनशिवे यांनी पालकमंत्र्यांचे भरभरुन कौतुक केलं. चंदनशिवे यांनी त्यांना मुख्यमंत्री व्हा असे म्हणत त्‍यांचं कौतुक केले. त्यानंतर पालकमंत्री भरणे यांनी बोलताना, दादा मला खूप काही मिळालं आहे. तुम्हाला काय द्यायचाय तो आशीर्वाद माझ्या अजितदादांना द्या असे म्हटले. दरम्यान, महापौरांनी निधीसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख केला. त्यावेळी, मुख्यमंत्र्यांच जाऊ द्या, मरु द्या असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर, पुढे सारवासारव करत, आपण मुख्यमंत्र्यांकडून मोठा निधी घेऊ, असेही ते म्हणाले.

भरणे यांच्या या वक्तव्यावरुन जिल्ह्यातील शिवसैनिक आणि स्थानिक नेत्यांनी पालकमंत्री भरणेंना फैलावर घेतले होते. याबाबतचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर, सोलापूरचे नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर आणि शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख यांनी संताप व्यक्त केला होता. माजी मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी पालकमंत्री भरणेंनी औकातीत राहावे, अशा शब्दात दम भरला.

आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक, उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक. तुम्हाला जनतेनं फेकून दिलं होतं, पण केवळ उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादामुळेच तुम्ही आज सत्तेत आहात. तुम्ही तुमच्या औकातीत राहून शब्द वापरा. सोलापूर जिल्ह्याची बाँड्री, तुम्हाला उजनी धरण ओलांडू देणार नाही, ही शिवसैनिकांची ताकद एका क्षणात तुम्हाला दाखवू शकतो. फक्त शिवसेनाप्रमुखांच्या आदेश आणि महाविकास आघाडीचं बंधन आम्ही पाळत आहोत, असा इशाराच तानाजी सावंत व्हिडिओतून दिला.

भरणेंकडून दिलगिरी

मुख्यमंत्र्यांविषयी विधान अवधानाने झाले. त्याचा विपर्यास करु नये असे सांगत मंत्री भरणे यांनी दिलगिरी व्यक्त केली. शिवसैनिकांनीच हा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला आहे. त्यामध्ये, उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे नेते आहेत, आमचे सर्वांचे नेते आहेत. माझे त्यांच्यावर खूप प्रेम आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचं कामही खूप चांगलंय, असे म्हणत भरणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक करत, आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button