Top Newsराजकारण

शिवसेना नेते रामदास कदमांना विधानभवनात जाण्यापासून रोखले !

वैभव खेडेकर काय तुमचे जावई आहेत का?; आपल्याच सरकारला सवाल

मुंबई : शिवसेना नेते रामदास कदम गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. मंत्री अनिल परब यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे रामदास कदम यांनी शिवसेनेत खळबळ उडवून दिली होती. त्यातच आता विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनासाठी रामदास कदम विधानभवनात जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांनी त्यांना गेटवरच अडवले. त्यामुळे कदम यांना विधिमंडळाच्या गेटवर ताटकळत उभं राहावं लागलं. त्यानंतर काही वेळाने त्यांना प्रवेश देण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. केवळ आरटीपीसीआर चाचणी करणाऱ्यांनाच विधिमंडळात प्रवेश देण्यात येत आहे. त्याचसोबत गर्दी होऊ नये म्हणून स्वीय सहाय्यकांना विधिमंडळाबाहेर उभारण्यात आलेल्या शेडमध्ये बसण्याची व्यवस्था केली आहे. रामदास कदम यांनी कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी केली नसल्याने पोलिसांनी त्यांना गेटवरच अडवले. रामदास कदम फोनवर बोलत होते. परंतु त्यांना गेटवरच ताटकळत ठेवण्यात आले त्यानंतर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांनी रामदास कदमांची अँन्टिजेन चाचणी करत त्यांचा विधानभवनात प्रवेश झाला.

रामदास कदम यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेत शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणले. मंत्री अनिल परब हे शिवसेनेचे गद्दार आहेत असा आरोप त्यांनी केला होता. या राजकीय वादाची पार्श्वभूमी असल्याने रामदास कदम यांना विधिमंडळाच्या गेटवरच अडवले का? अशी चर्चा सुरु झाली. परंतु आरटीपीसीआर चाचणीशिवाय कुणालाही विधान भवनात प्रवेश घेता येत नाही. कोरोनामुळे सदस्यांच्या सुरक्षेसाठी ही काळजी घेत बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश नाकारण्यात येतो. तोच नियम माजी मंत्री रामदास कदम यांच्यासाठी वापरण्यात आला आहे.

१९७० सालापासून भगव्या झेंड्याचा शिपाई म्हणून शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक म्हणून ५२-५३ वर्ष शिवसेनेचे निष्ठेने काम करत आहे. कोकणातील काही राजकीय पुढाऱ्यांना माझी अडचण होत असल्यामुळे काही बिनबुडाच्या बातम्या छापून आणल्या जातात. आम्हा जुन्या नेत्यांना मंत्री पद दिले नाही त्याचे कुठे ही दु:खं नाही. पक्षाने मला पुष्कळ काही दिले आहे. मात्र विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी माझ्या मुलाला तिकिट देऊ नका व राष्ट्रवादीच्या आमदाराला जो मातोश्रीवर घेऊन आला होता व त्याला तिकिट द्या असे सांगणारा तुमचा विश्वासू म्हणून महाराष्ट्र ओळखतो व ज्याला मंत्री केले आहात तोच पुढारी त्याच राष्ट्रवादीच्या पुढाऱ्याला हाताशी पकडून मला कोकणातून संपवण्याचं राजकारण करत आहे का? असा प्रश्न कदमांनी उपस्थित करत अप्रत्यक्षपणे अनिल परब यांच्यावर निशाणा साधला होता.

वैभव खेडेकर काय तुमचे जावई आहेत का?;

खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना निलंबित करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज आपल्याच सरकारला घेरलं. वैभव खेडेकरांना अपात्र करण्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला असताना त्यांना अपात्र का केलं जात नाही? असा सवाल करतानाच खेडेकर काय तुमचे जावई आहेत का? असा सवाल रामदास कदम यांनी थेट आपल्याच सरकारला केला आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या नगरविकास खात्यावरच हल्ला चढवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

रामदास कदम यांनी आज विधान परिषदेत मनसेचे नेते आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या भ्रष्टाचाराचे मुद्दे मांडतानाच या प्रकरणाकडे कानाडोळा करणाऱ्या ठाकरे सरकारवरही हल्लाबोल केला. नगराध्यक्ष खेडेकर यांनी नगरपालिकेत अनेक भ्रष्टाचार केले. २० प्रस्ताव केले. त्यांना अपात्र करण्यासाठी ५० टक्के नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला. २० पैकी ११ मुद्द्यात ते अपात्र होऊ शकतात, असा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी नगरविकास खात्याकडे पाठवला आहे. नियमाप्रमाणे नगरविकास खात्याने 15 दिवसात त्यांना अपात्र केलं पाहिजे. पण दोन महिने झाले प्रस्ताव राखून ठेवला. त्यांना अपात्र केलं जात नाही. ११ मुद्द्यावर भ्रष्टाचार केला हे सिद्ध झालं आहे. त्यांना पाठिशी का घालता? ते तुमचे जावई आहेत का? असा सवाल कदम यांनी केला. त्यानंतर मीडियाशी बोलताना कदम यांनी खेडेकरांवरील तीन गंभीर आरोपांवर भाष्य केलं.

कदमांचे तीन गंभीर आरोप

मनसेचे नगराध्यक्ष आहेत. ते राष्ट्रवादीसोबत असतात. खेडमध्ये भडगाव आहे. तिथे बौद्धवाडी असल्याचं दाखवून समाजकल्याणचा २० लाखांचा निधी आणून नाल्यावर पूल बांधला. बौद्धवाडीच्या नावाने खासगी बिल्डिंगमध्ये जाण्यासाठी हा पूल बांधला. त्या इमारतीत त्याच्या पत्नीच्या नावाने वैभवी वैभव खेडेकर या नावाने चार फ्लॅट आहेत. माझ्याकडे कागदपत्रं आहेत. या संबंधात मी अनेक तक्रारी केल्या. सार्वजनिक बांधकामापासून सामाजिक न्याय विभागापर्यंत तक्रारी केल्या. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केली. या पुलाचा बौद्धवाडीसाठी उपयोग होत नाही असं ग्रामपंचायतीने लिहून दिलं. तसा ठरावच ग्रामपंचायतीने केला आहे. तिथे बौद्धवाडी नसल्याचं पंचायतीने सांगितलं आहे. सभापती आणि बीडीओने या प्रकरणाची चौकशी केली. प्रांतअधिकारीही घटनास्थळी येऊन गेले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्याने समाजकल्याणला अहवाल पाठवला. शासनाची फसवणूक करून २० लाख वापरल्याचं सांगून या प्रकरणी कारवाई करा असं जिल्हाधिकाऱ्याने म्हटलं. एक महिना झाला पण कारवाई झाली नाही.

खेड नगरपालिका क वर्ग पालिकेत येते. नगराध्यक्षांना ५० टक्क्यांपेक्षा अधिक खर्च असल्यामुळे नियमाने त्यांना एकही लिटर डिझेलही वापरता येत नाही. पण खेडेकरांनी स्वत:च्या गाडीसाठी साडेतीन लाख रुपये डिझेलसाठी वापरले. खासगी गाड्यांसाठी २३ लाख रुपयांचे डिझेल वापरले. काही गाड्यांचे नंबर नाहीत. बंद गाड्याच्या नावाने डिझेल वापरले. हा भ्रष्टाचार होत असल्याने मी नगरविकास खात्याकडे तक्रार केली. नगरविकास खात्याने चौकशी केली. त्यांनी गुन्हा दाखल करायला सांगितला. पण दोन महिने झाले गुन्हा दाखल होत नाही.

खेडचे नगराध्यक्ष खेडेकर यांची अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे काढली. त्यानंतर ५० टक्क्यांपेक्षा अधिक नगरसेवकांनी त्यांना अपात्र करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला. जिल्हाधिकाऱ्यांनी दोघांची सुनावणी घेतली. त्याचा अहवालही पाठवला. ११ प्रकरणात त्यांनी खेडेकरांना दोषी ठरवलं. सभागृहाचे ठराव बदलणं, कंत्राटदारांच्या बिलावर एकट्यानेच सही करणं असे अनेक मुद्दे आहेत, या प्रकरणी त्यांना दोषी ठरवलं आहे. पण नगरविकास खात्याने हे प्रस्ताव दाबून ठेवले आहेत. त्यांना अपात्रं केलं जात नाही. कारवाई केली जात नाही. नगरविकास खातं आमचं आहे. पण गंमत म्हणजे त्यांना अपात्र करणं राहिलं बाजूला त्यांना संरक्षण दिलं जात आहे. म्हणून सर्व मुद्दे सभागृहात मांडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button