
मुंबई: रस्त्यावर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांची हाणामारी सुरु आहे, तर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेत शाब्दिक चकमकी झडत असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. आधी फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांमध्येच चर्चा झाली. या भेटीतील तपशील गुलदस्त्यात असला तरी या भेटीमुळे तर्कवितर्कांना एकच उधाण आलं आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेनंतर राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळत आहे. शिवसेना, भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले. पक्ष कार्यालयांची तोडफोड झाली. यानंतर आता वेगळ्याच घडामोडी सुरू झाल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल शिवसेनेबद्दलच्या युतीबद्दल सूचक विधान केल्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांचाही सूर थोडा बदलला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या बैठकीत राजकीय विषयावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. त्यानंतर फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या १५ मिनिटं चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. विशेष म्हणजे राणेंच्या अटक नाट्याला दोन दिवस होत नाही तोच फडणवीस-ठाकरेंमध्ये चर्चा झाल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.
राणेप्रकरणानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. तसेच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संयम बाळण्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. दरम्यान, या बैठकीत राणेंबाबत नेमकी काय चर्चा झाली? याचा तपशील गुलदस्त्यात आहे. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.