Top Newsराजकारण

नारायण राणेंच्या बंगल्याबाहेर शिवसैनिक-राणे समर्थक भिडले, तुफान राडा; पोलिसांचा लाठीचार्ज

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. मुंबईतील जुहू परिसरात युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी नारायण राणेंच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं दिसून आलं. वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी नारायण राणे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मुंबईत युवासेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीजार्ज केला. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानावर धडक देत आंदोलन सुरु केलं आहे.

आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी नारायण राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी सुद्धा जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. सकाळपासूनच या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, कार्यक्रते इतके आक्रमक होते की जोरदार राडा झाला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला.

नितेश राणेंनी दिलं होतं आव्हान

नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं, “असं ऐकलं की युवासेनेचे कार्यकर्ते आमच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर जमणार आहेत. एकतर मुंबई पोलिसांनी शिवसैनिकांना रोखावे अन्यथा यापुडे जे काही होईल त्याची जबाबदारी आमची नाही. सिंहाच्या हद्दीत शिरण्याचे धाडस करु नका. आम्ही तुमची वाट पाहतोय”. नितेश राणे यांनी रात्रीच्या सुमारास हे ट्विट केलं आहे.

युवा सेनेचे कार्यकर्ते आक्रमक

युवा सेनेचे कार्यकर्ते नारायण राणे यांच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्याला राणे समर्थकांनी विरोध केला. दोन्ही कार्यकर्ते आक्रमक असल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. दोन्ही कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर केला. आक्रमक शिवसैनिक नारायण राणे यांच्याविरोधात घोषणाबाजी करत होते. तर भाजपा कार्यकर्तेही उद्धव ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी करत होते. वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेलं चिथावणीखोर विधान केंद्रीय मंत्री नारायण राणेंना महागात पडण्याची शक्यता आहे. राणेंच्या विधानाप्रकरणी महाड आणि नाशिकमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. राणेंचं विधान गंभीर असून त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश नाशिक पोलिसांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नारायण राणेंनी आक्रमक पवित्रा घेत शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. शिवसेनेत पूर्वीचे शिवसैनिक राहिलेले नाहीत. यांची उडी कुठपर्यंत जाते ते पाहू. केंद्रात आमचीच सत्ता आहे, असा सूचक विधान राणेंनी केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button