मनोरंजन

राज कुंद्राच्या पॉर्न उद्योगाची शिल्पाला पूर्ण कल्पना; शर्लिन चोप्राचा दावा

राज कुंद्रा, रायन थॉर्पला जामीन देण्यास कोर्टाचा नकार

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीला तिचा पती राज कुंद्रा अश्लील चित्रपट बनवत असल्याबद्दल पूर्ण कल्पना होती. मात्र, आता ते खोटे बोलत आहेत, याची मला माहिती नाही, असा धक्कादायक जबाब अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडे नोंदविला असल्याचे समजते. दरम्यान, अश्लील चित्रपटांची निर्मिती करून त्या प्रसारित केल्याप्रकरणी अटकेत असलेला व्यावसायिक व अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा व त्याच्या कंपनीतील आयटी प्रमुख रायन थॉर्प यांची जामिनावर सुटका करण्यास उच्च न्यायालयाने शनिवारी नकार दिला.

गुन्हे विभागाच्या मालमत्ता कक्षाने शुक्रवारी सुमारे ८ तास शर्लिनची कसून चौकशी केली. त्यामध्ये तिने या प्रकरणातील कुंद्राचे अनेक ‘राज’ उलगडले आहेत. तिच्या जबाबाच्या अनुषंगाने पुराव्याची पडताळणी करून आणखी काही जणांकडे चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
अश्लील चित्रपट बनवून वेब सिरीजद्वारे त्याचे वितरण केल्याच्या आरोपाखाली मालमत्ता कक्षाने १९ जुलैला राज कुंद्राला आणि त्याच्या कंपनीचा आयटी प्रमुख रायन थॉर्पला अटक केली आहे.

शर्लिनने जबाबात सांगितले आहे की, राज कुंद्राशी पहिली भेट २३ जून २०१९ रोजी जेडब्ल्यू मेरियट हॉटेलमध्ये झाली होती. त्यानंतर त्याच्याशी व त्याच्या मॅनेजरशी भेटून कामासंबंधी करार करण्यात आले. त्यानुसार मी एअरप्राइमसाठी ३ व्हिडिओ शूट केले. मात्र, हॉटशॉटसाठी एकही व्हिडिओ दिलेला नाही. शिल्पा शेट्टीच्या स्ट्रिम कंपनीबरोबरही ३ व्हिडिओ बनविले. त्याचे मानधन आपल्याला अजूनही देण्यात आलेले नाही. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर मी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ती मागे घेण्यासाठी माझ्यावर मोठा दबाव आणण्यात आला, त्यानंतर पॉर्न फिल्मचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली होती, असेही तिने जबाबात म्हटले असल्याचे सांगण्यात आले आहे. राज हा आपले फोटो व व्हिडिओ शिल्पाला आवडतात असे सांगून माझी स्तुती करायचा. त्यामुळे मला काम करण्यात आनंद मिळत होता, असे तिने नमूद केले आहे.

बोल्ड फोटो व शूटिंगसाठी राज कुंद्रा व त्याचे सहकारी सर्वजण असे व्हिडिओ बनवतात, असे सांगून त्यासाठी प्रेरित करीत असे. त्यांच्या शूटची सुरुवात बोल्डपासून सुरू होऊन नग्नतेपर्यंत जात असे. त्यांनी अनेक तरुणींची अशा प्रकारे फसवणूक केली आहे. त्या पीडितांचे जबाब नोंदविले गेल्यास धक्कादायक माहिती समोर येईल, असेही शर्लिन चोप्रा हिने जबाबामध्ये सांगितले असल्याचे समजते.

जामिनावर सुटका नाहीच

न्या. अजय गडकरी यांच्या एकलपीठाने या दोघांच्या जामीन अर्जावरील निकाल २ ऑगस्ट रोजी राखून ठेवला होता. या प्रकरणात कुंद्रा व थॉर्प हे १९ जुलैपासून अटकेत आहेत. न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्यांचे जामीन अर्ज २८ जुलै रोजी फेटाळले. त्यानंतर त्यांनी अटक कारवाईच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्या. न्या. गडकरी यांनी या दोघांचा युक्तिवाद फेटाळत म्हटले की, दंडाधिकाऱ्यांनी सुनावलेली कोठडी कायद्यास अनुसरून आहे. त्यामुळे त्यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही.

या दोघांनाही आपल्याला बेकायदेशीरपणे अटक केल्याचे याचिकेत म्हटले होते. अटक करण्यापूर्वी फौजदारी दंडसंहिता (सीआरपीसी) ४१ (ए) दिली नाही. ४१ (ए) कलमानुसार, आरोपीला अटक करण्याची आवश्यकता नसेल तर पोलीस त्याला समन्स बजावून त्याचा जबाब नोंदवू शकतात. मात्र, पोलिसांनी कायद्याने बंधनकारक असलेली नोटीस बजावली नाही, असे कुंद्रा याने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते.

राज्य सरकारने कुंद्राच्या जामिनावर आक्षेप घेतला होता. आरोपी पुरावे नष्ट करत असताना तपास यंत्रणा बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही. कुंद्राच्या कार्यालयातील लॅपटॉपमधून पोलिसांना ६८ पॉर्न व्हिडिओ सापडले. आधी ५१ व्हिडिओ जप्त केले होते. तसेच हॉटशॉट व बॉलीफेम या दोन ॲपची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आढळली, असे पै – कामत यांनी न्यायालयाला सांगितले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button