कंगना रणौतवर वाङमय चोरीचा आरोप; गुन्हा दाखल
मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत आणखी एका वादात सापडली आहे. एका लेखकाची कथा चोरल्याप्रकरणी कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक आणि कॉपीराईट नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपांतर्गत या गुन्ह्याची नोंद झाली आहे.
कंगना रनौतने 14 जानेवारीला मणिकर्णिका रिटर्न्स- द लीजेंड ऑफ दिद्दा या चित्रपटाची घोषणा केली होती. त्यानंतर लगचे दुसऱ्या दिवशी ‘दिद्दा- द वॉरियर क्वीन ऑफ काश्मीरचे’ लेखक आशिष कौल यांनी कंगनावर कॉपीराईटच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. चित्रपटासाठी माझ्याकडून कोणतीही परवानगी घेतली नाही, असे म्हणत कंगना आणि टीमला नोटीस पाठवली होती. मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या निर्देशानुसार कंगना रनौत, बहिण रंगोली रनौत, भाऊ अक्षय रनौत आणि चित्रपटाचे निर्माते कमल जैन यांच्याविरुद्ध खार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
कंगना विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आशिष कौल यांनी सांगितले की, जानेवारी महिन्यात मी कंगनाला आणि चित्रपट निर्मात्यांना कथा चोरल्याप्रकरणी नोटिस पाठवली होती. त्या नोटिसेला कंगनाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. वांद्रे इथल्या महानगर दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणाच्या सुनावणीनंतर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मी कंगना विरोधात पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. तक्रारदार लेखक आशिष रतनलाल कौल यांनी ‘द लिजेंड ऑफ दिद्दा’ हे पुस्तक लिहिलंय. कौल यांनी आपल्या या पुस्तकाची कथा काही दिवसांपूर्वी कंगनाला ईमेलवरुन पाठवली होती. त्यानंतर काही दिवसांनी याच कथेवर आधारित चित्रपटाची घोषणा कंगनाने ट्विटरवरुन केली. मात्र ही घोषणा करण्याआधी कंगनाने परवानगी घेतली नाही असा आरोप कौल यांनी केलाय.