Top Newsआरोग्यराजकारण

शरद पवारांची ७ दिवसातच कोरोनावर मात

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र पवार यांनी कोरोनावर मात केली आहे. अवघ्या सात दिवसांमध्ये शरद पवार यांनी कोरोनावर मात केली आहे. शरद पवार यांनीच आपण कोरोनामुक्त झाल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे. आज माझी पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. माझी तब्येत देखील चांगली आहे. मला कोरोना झाल्यानंतर मी लवकर बरा व्हावा यासाठी अनेकांनी प्रार्थना केली, ते माझे सर्व सहकारी, मित्र, हितचिंतक आणि डॉक्टरांचे मी आभार मानतो असे शरद पवार यांनी म्हटले आहे. सात दिवसांपूर्वी शरद पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच स्वपक्षासह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी सुद्धा पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार यांना मुंबईतील सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी होमक्वारंटाइन करण्यात आले होते. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू होते. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती देत त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले होते. शरद पवारांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांचे पूर्वनियोजित ७ दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. मात्र आता ते कोरोनामुक्त झाले असून लवकरच पुन्हा नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.

शरद पवार यांना २४ जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली. त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यावेळी देखील शरद पवार यांनी ट्वीट करत कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले होते. तसेच आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती देखील त्यांनी केली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच पवारांनी उपचार घेतले होते. अखेर उपचाराअंती पवारांनी कोरोनावर मात केली आहे. खुद्द पवार यांनी ट्वीट करून कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली असल्याची माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button