शरद पवार-अमित शाह भेटीच्या बातमीने महाराष्ट्रात चर्चेला उधाण

मुंबई : शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती एका गुजराती वृत्तपत्राने दिली आहे. पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते. त्यानंतर शांतिग्राममधील गेस्टहाऊसला तिघांची भेट झाली, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे. या भेटीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर या भेटीचे परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शरद पवार आणि अमित शाह यांची 26 मार्चला अहमदाबादमध्ये गुप्त भेट झाल्याच्या कथित वृत्तानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एकीकडे राज्यात भाजपच्या नेत्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात रान उठवले आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. या मुद्द्यावरुन भाजपचे नेते महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणायची भाषाही करत आहेत. नेमक्या त्याचवेळी शरद पवार आणि अमित शाह (Amit Shah) यांची झालेली ही भेट अनेकांसाठी चक्रावून टाकणारी आहे.
या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या खास मर्जीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले आहे. या भेटीमागचे राजकारण नव्या पिढीला कळणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. शरद पवार आणि अमित शहा यांची गुप्त भेट झाली तर तुमचे कोण गुप्तहेर होते हे माहीत नाही. पण 50 वर्षांच्या राजकीय जीवनात कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी जेवढे मित्र कमावले नाहीत तेवढे मित्र पवार साहेबांनी कमावले आहेत. मग त्यातील कश्मीरचे फारूक अब्दुल्ला असतील, ओदिशातील विजू पटनाईक असो बंगालमधले ज्योती बसू असो. ज्या ज्या राज्याचे प्रमुख नेते आहेत ते कायम शरद पवार यांचे मित्र राहिलेत. आपल्या राज्यातील भाजप नेते प्रमोद महाजन हे यांच्याशीही शरद पवार यांचे जवळचे संबंध होते. संबंध आणि राजकारण याचा विचित्र प्रकार आता नवीन पिढीच्या राजकारणात आलाय. राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो, तो फक्त वैचारिक विरोधक असतो, अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली.
राष्ट्रवादीने वृत्त फेटाळलं
अँटिलिया प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते असलेले ‘गृहमंत्री’ अनिल देशमुख अडकल्याने राष्ट्रीय पातळीवरही दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मात्र ही अफवा असल्याचं सांगत भेटीचं वृत्त नाकारलं आहे. शरद पवार यांनी भाजप नेत्यांची भेट घेण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपने गुजराती वर्तमानपत्रातून अशा बातम्या पेरल्या आहेत, असा दावा मलिक यांनी केला.
भाजप नेत्याची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजपचे चाणक्य अमित शाह (Amit Shah) यांच्यात अहमदाबाद येथे गुप्त भेट झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भाजपकडून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकासआघाडी सरकारमध्ये अस्वस्थता असल्याचे सांगितले. महाविकासआघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसून आता घालमेल बाहेर येत आहे. केवळ नशीबाच्या जोरावर फार काळ सरकार चालवता येत नाही, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले.
यावेळी प्रवीण दरेकर यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील शाब्दिक वादावादीचा दाखला दिला. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हे सरकार आमच्या टेकूवर उभे आहे, असे सांगितले. तर अजित पवार यांनी महाविकासआघाडीत मीठाचा खडा टाकू नये, असे आपल्या मित्रपक्षातील नेत्यांना सुनावले आहे. या सगळ्यातून सरकारमधील अस्वस्थता समोर येत आहे, असे दरेकर यांनी सांगितले.
अमित शहांची सूचक प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत अहमदाबादमध्ये गुप्त बैठक पार पडली असं वृत्त समोर आलं आहे. यावर अमित शहा यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकार परिषदेत पवारांसोबत बैठक झाली का यावर सर्व गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात असं म्हणत सूचक प्रतिक्रिया दिली.