Top Newsराजकारण

कोकणातील दहशतवादाच्या चौकशीसाठी शाहांनी एसआयटी नेमावी: संजय राऊत

गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग व्हावा ही राहुल- प्रियंका गांधी यांची इच्छा

पणजी : श्रीधर नाईक, अंकूश राणे, सत्यविजय भिसे, कालपरवा संतोष परब यांच्याबाबतीत काय झालं? मी तर म्हणेन केंद्रीय गृहमंत्रालयाने एसआयटी नेमावी. दहशतवादाबाबत कुणाला काही प्रश्न पडले असेल तर राणेंनी अमित शाह यांच्याकडे मागणी करावी, आम्हाला अडचण नाही. सिंधुदुर्गच काय राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात राजकीय दहशतवाद असूच नये, राजकारणात एक मोकळेपणा असला पाहिजे, अशी कोपरखिळी शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मारली आहे.

एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी राणे यांचा समाचार घेतला. राणेंना टीका करण्याचा अधिकार आहे, मात्र मर्यादा पाळल्या पाहिजेत. राणेंनी हातात लेखणी घेऊन काही मतं मांडली असेल तर लोकशाहीत आदर केलाच पाहिजे. फक्त तुम्ही खून करू नका, असा टोला राऊत यांनी राणे यांना लगावला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक खूप मोठा विषय आहे वाटत नाही. हा एका जिल्ह्यातील विषय आहे. अनेक जिल्ह्यात बँकेच्या निवडणुका झाल्या पण एकाच जिल्ह्यात असे वातावरण झालं. एकाच जिल्ह्यात वातावरण का? याचा विचार केला पाहिजे. याबाबत राणेंच्या नेतृत्वात एखादं चर्चासत्र कुणी घेतलं तर आमचे लोक चर्चासत्राला उपस्थित राहील, असाही टोला त्यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रातच कांगावा का ?

सर्व लोक मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची माहिती घेत असतात. गोव्यातील अनेक खासदारांनी माहिती घेतली. त्यांच्यावर काही वैद्यकीय बंधनं आहेत. ती पूर्ण काळ राहत नाहीत, हळूहळू त्यातून माणूस उभा राहतो आणि काम करतो. देशात अनेक धडधाकट माणसं आहेत. देशाच्या राजकारणात, ते काहीच काम करत नाहीत. त्यांना दिल्लीतील व्यवस्था काहीच काम करू देत नाही. त्यांच्याविषयी काय म्हणणार? त्या मानाने महाराष्ट्रात गोंधळ का निर्माण करता? असा सवाल त्यांनी भाजपला केला आहे. मुख्यमंत्री, अजित पवार, बाळासाहेब थोरात, नाना पटोले हे सर्व मिळून काम करत आहेत. चिंता करू नका. भाजपने शब्दांचे किती बार फोडले तरी सरकारचा केसही वाकडा होणार नाही. तुम्ही कितीही बोलत राहिला याला लकवा मारला, त्याला लकवा मारला, तर लकवा मारलाय म्हणजे काय हे काय पाहायचं असेल तर केंद्राकडे जाऊन पाहिलं पाहिजे. त्यांची कामाची पद्धत काय आहे? अशी टीका त्यांनी केली आहे.

पादरेपावटे फुसफुसले म्हणजे सरकारला आग लागत नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून विरोधकांनी सल्ले देण्यास सुरुवात केली आहे. त्यावरून राऊत यांनी विरोधकांची पिसे काढली आहेत. दोन-चार पादरेपावटे फुसफुसले म्हणजे सरकारला आग लागत नाही. पक्षातले आणि सरकारमधले यात फरक असतो, असं राऊत म्हणाले.

राज्यपालांनी मर्यादा पाळाव्यात

राज्यपाल पदावरील व्यक्तीने मर्यादा पाळल्या पाहिजे. मग ते मेघालयाचे असो महाराष्ट्राचे असो की पश्चिम बंगालचे. त्यांनी काही अद्वातद्वा बोललं की आम्ही त्यांचं समर्थन करणार नाही. महाराष्ट्राच्या राज्यपालांविषयी एक भूमिका आणि मेघालयाच्या राज्यपालांबाबतची दुसरी भूमिका असं आम्ही करणार नाही. राज्यपालांनी घटनेचं आणि पदाचं पालन केलं पाहिजे. राजकीय विधान करायचं असेल तर राजीनामा देऊन बोललं पाहिजे. सत्यपाल मलिक बोलले ते चुकीचं आहे. पंतप्रधानांचं म्हणणं आवडलं नसेल आणि सार्वजनिक बोलायचं असेल तर त्यांनी राजीनामा देऊन बोललं पाहिजे, असेही राऊत म्हणाले.

अब्दुल सत्तारांची हळद अजून उतरायचीय

शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनीदेखील काल जाहीरपणे वक्तव्य केले. रश्मी ठाकरे मुख्यमंत्री पदी विराजमान होऊ शकतील, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. याविषयी संजय राऊत यांनी थेट वक्तव्य केले. ते म्हणाले, ‘ उद्धव ठाकरे यांची प्रकृती उत्तम आहे. मी सध्या गोव्यात आहे. पण मला त्यांची माहिती आहे. कालही त्यांनी शिवसेनेचे विभागप्रमुख, शाखाप्रमुखांशी संवाद साधला. सध्या प्रत्यक्ष संवादापेक्षा सगळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच संवाद साधत आहेत. सगळ्यांना दिसतायत ते संवाद साधताना. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील तसाच संवाद साधत आहेत. शेवटी व्यक्ती समोर दिसते, सूचना देते, फायलींवर सह्या होतायत. प्रशासनाला सूचना दिल्या जातायत. राज्यावर लक्ष ठेवलं जातंय,हे सगळं सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचा राज्यकारभार सुरु आहे. तेच मुख्यमंत्री राहतील आणि त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील. यात मला कोणतीही शंका वाटत नाही.’

अब्दुल सत्तार यांनी रश्मी ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाविषयीचे वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, हे जे मंत्री आहेत त्यांनी पक्षात २५ वर्ष पूर्ण केली तर त्यांच्या विधानाला काही अर्थ राहील, अजून त्यांच्या अंगावरची हळद उतरायची आहे बरीचशी. अजून त्यांना शिवसेनेची हळद पूर्णपणे लागायची आहे. बोलू द्या त्यांना, दुसरं कोण बोलतंय का? प्रमुख लोकांपैकी? असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

राज्यातील एक राज्यमंत्री आमचे सहकारी आहेत. मात्र, ते शिवसेनेची भूमिका मांडत नाहीत. तुम्ही चर्चा करता म्हणून चर्चा होते. उद्धव ठाकरे यांची प्रकृती उत्तम आहे. कालही त्यांनी शिवसेनेच्या विभागप्रमुख आणि शाखाप्रमुखांशी झूमद्वारे संवाद साधला. पंतप्रधानांशीही झूमद्वारे संवाद साधतात. शेवटी व्यक्ती दिसतेच ना समोर. व्यक्ती आदेश देते, सूचना करते, बोलते यालाच राज्यकारभार करणं म्हणतात. फायलींवर सह्या होत आहेत. प्रशासनाला सूचना दिल्या जात आहे. राज्यावर लक्ष आहे. त्यामुळे कोण काय बोलत आहे आणि काय करत आहे याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.

गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग व्हावा…

गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग व्हावा, ही राहुल आणि प्रियंका यांची इच्छा असल्याचे सुतोवाच संजय राऊत यांनी केले. गोव्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. गोव्यात भाजपला कधीच बहुमत मिळालं नाही. यावेळीही मिळणार नाही. भाजपच्या सरकारविषयी त्यांच्या कारभाराविषयी गोव्यातील जनतेत प्रचंड राग आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला. ते पुढे म्हणाले की, गोव्यात महाविकास आघाडी व्हावी ही आमची इच्छा आहे. काँग्रेसची आहे का? राहुल गांधींची इच्छा आहे. प्रियांका गांधींची इच्छा आहे. गोव्यात आघाडी व्हावी. पण स्थानिक लोकं आहेत, त्यांच्याशी सतत बोलतो. त्यांचा राष्ट्रीय राजकारणाशी किती कनेक्ट आहे हे माहीत नाही. त्यांनी समजून घेतलं पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. राऊत म्हणाले, गोव्यात काँग्रेसला संपूर्णपणे संपवण्याचं काम सुरू आहे. गोव्यातील काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने संयमाची आणि समंजसपणाची भूमिका घेतली, तर आम्ही सर्व एकत्र येऊन काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं राज्य स्थापन करू शकतो, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button