फोकस

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एक दिवसाची पोलीस कोठडी

मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन यांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एनसीबीच्या वकिलांनी या आरोपींची दोन दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र कोर्टानं या तीन आरोपींना एक दिवसाची कोठडी सुनावली आहे. आता उरर्वरित पाच आरोपींना पोलीस कोर्टात कधी हजर करतात हे पाहावं लागणार आहे.

मुंबईतील समुद्रात एका क्रूझवर आयोजित ड्रग्ज पार्टीत ताब्यात घेण्यात आलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला आता चौकशीअंती अमलीपदार्थ नियंत्रक कक्षानं अखेर अटक केली. आर्यन खानसह एकूण ८ जणांना याप्रकरणी अटक झाली आहे. यात आर्यन खान, मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्चंट यांचा समावेश आहे. तिघांनाही वैद्यकीय चाचणीसाठी मुंबईतील जे.जे.रुग्णालयात नेण्यात आलं. वैद्यकीय चाचणीनंतर तिघांनाही किला कोर्टात हजर करण्यात आले.

एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखाली काल मुंबईतील समुद्रात एका क्रूझवर एनसीबीनं सापळा रचून छापा टाकला होता. यात मोठी ड्रग्ज पार्टी उधळून लावण्यात आली आणि एकूण १० जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. यात तीन मुलांचाही समावेश आहे. आठ आरोपींकडून चरस, एमडीएमए, एमडी आणि कोकेन जप्त करण्यात आलं होतं.

समोर आलेल्या माहितीनुसार कॉर्डेलिया या २ हजार प्रवासी क्षमतेच्या आलीशान क्रूझवर ड्रग्ज पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यात उच्चभ्रू वर्गीयांचा प्रामुख्याने समावेश होता. याप्रकरणी आर्यन खान याचीही चौकशी केली गेली. ड्रग्ज पार्टीशी आर्यन खान याचा काय संबंध होता याबाबत त्याची चौकशी करण्यात आली.

कॉर्डिलिया क्रूझ कंपनीचा हात झटकण्याचा प्रयत्न

आता कॉर्डिलिया कंपनीकडून याप्रकरणात एक स्पष्टीकरण जारी करण्यात आलं आहे. मुंबईत झालेल्या कथित रेव्ह पार्टीशी कॉर्डिलिया कंपनीचा कोणताही संबंध नसल्याचं कंपनीच्या सीईओंनी म्हटलं आहे. दिल्लीस्थित एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला खासगी कार्यक्रमासाठी क्रूझ देण्यात आली होती. कंपनीनं हा कार्यक्रम आयोजित केला नव्हता, असं स्पष्टीकरण कॉर्डिलिया क्रूझ कंपनीकडून देण्यात आलं आहे. याशिवाय संबंधित प्रकरणात तपास यंत्रणांना पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे.

मुंबईतील कथित ड्रग्ज पार्टीशी कॉर्डिलिया कंपनीचा दुरान्वये संबंध नाही. या प्रकरणाशी कंपनीचा प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नाही. आमच्यासोबत गेली अनेक वर्ष जोडल्या गेलेल्या ग्राहकांच्या मनोरंजनासाठी कंपनी आजवर कटिबद्ध राहिली आहे. संबंधित घटना आमच्या कंपनीच्या संस्कृतीच्या पूर्णपणे विरोधी आहे. अशापद्धतीच्या कार्यक्रमांचा किंवा घटनांचा आमची कंपनी पूर्णपणे विरोध करते. तसंच यापुढील काळात अशा कार्यक्रमांसाठी क्रूझ उपलब्ध करुन दिली जाणार नाही याची काळजी घेतली जाईल. असं असलं तरी संबंधित प्रकरणासाठी तपास यंत्रणांना पूर्णपणे सहकार्य करण्याची आमची तयारी आहे, असं कॉर्डिलिया क्रूझ कंपनीचे सीईओ जुर्गेन बेलोम यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button