नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात बहुतांश मंत्र्यांवर खटले सुरू आहेत. काहींवर हत्या आणि हत्येचा प्रयत्न करण्यासारखे गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. नॅशनल इलेक्शन वॉच आणि एडीआरच्या नव्या रिपोर्टमधून हा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. एडीआरने हा रिपोर्ट मंत्र्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राच्या हवाल्याने तयार केला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळातील ७८ मंत्र्यांपैकी ४२ टक्के मंत्र्यांवर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे गुन्हे नोंद आहेत. यात हत्या आणि हत्येचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. २ दिवसांपूर्वी नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यात १५ नवीन कॅबिनेट आणि २८ राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली. यातील अनेक नावांचा समावेश गंभीर गुन्ह्यांमध्ये आहे. मंत्रिमंडळात ३३ मंत्री आहेत ज्यांच्यावर गुन्हे नोंद आहेत. त्यातील ३१ टक्के म्हणजे २४ मंत्र्यांवर गंभीर गुन्हे आहेत.
देशातील सर्वात कमी वयाचे नवे केंद्रीय गृह राज्यमंत्री निशिथ प्रमाणिक यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंद आहे. ३५ वर्षाचे प्रमाणिक हे पश्चिम बंगालच्या कूच बिहार परिसरातून येतात. प्रमाणिक यांचे शिक्षण ८ वी पर्यंत झाले आहे. तर इतर ३ मंत्र्यांवरही हत्येचा गुन्हा दाखल आहे. यात अल्पसंख्याक राज्यमंत्री जॉन बारला, अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी, आणि परराष्ट्र, संसदीय कार्यराज्यमंत्री वी. मुरलीधरन यांचाही समावेश आहे.
एडीआर रिपोर्टप्रमाणे कॅबिनेटमधील ७८ मंत्र्यांपैकी ९० टक्के म्हणजे ७० मंत्री कोट्यधीश आहेत. सरासरी संपत्ती १६.२४ कोटी इतकी आहे. चार मंत्र्यांनी त्यांची संपत्ती ५० कोटी असल्याचं जाहीर केले आहे. यात ज्योतिरादित्य शिंदे, पीयूष गोयल, नारायण राणे, राजीव चंद्रशेखर यांचा समावेश आहे. तर ८ असे मंत्री आहेत ज्यांची संपत्ती १ कोटीपर्यंत आहे. यात जॉन बारला, कैलास चौधरी, विश्वेश्वर टुडू, वी. मुरलीधरन, रामेश्वर तेली. शांतनु ठाकूर, निशिथ प्रमाणिक यांचा समावेश आहे. १६ मंत्र्यांपैकी ३ मंत्र्यांवर १० कोटीपेक्षा जास्त कर्ज आहे. यात नारायण राणे, पीयूष गोयल आणि कृष्णा पाल यांचा समावेश आहे.
१२ मंत्री म्हणजे १५ टक्के मंत्र्यांनी त्यांचे शिक्षण ८ वी ते १२ वी घेतल्याचं म्हटलं आहे. तर ६४ मंत्र्यांनी त्यांचे शिक्षण पदवीधर आणि त्याहून अधिक सांगितले आहे. ८ वी पास असलेले २, १० वी पास असलेले ३, १२ वी पास असलेले ७ मंत्री आहेत. १५ पदवीधर आणि १७ मंत्री व्यावसायिक विषयात पदवीधर आहेत. २१ मंत्र्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. तर ९ मंत्र्यांकडे डॉक्टरेट आहे.