ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांचे निधन
पुणे – ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पत्रकारनगर येथे राहत्या घरी गुरुवारी सकाळी त्यांचे निधन झाले. मराठी साहित्यामध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले असून दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. त्यांच्या पश्चात विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा आणि मोठा मित्रपरिवार आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा गतवर्षीचा (२०२१) मसाप जीवनगौरव पुरस्कार त्यांना देण्यात आला होता. अनिल अवचट यांनी साहित्यिक विश्वात आपलं मोठं योगदान दिलंय, त्यांच्या लिखाणात कायम त्यांचं संवेदनशील मत, अभ्यासक आणि संशोधक वृत्ती कायम दिसून आली.
त्यांच्या जाण्याने सामाजिक जाणीव असलेला, समाजकार्यात अग्रेसर असलेला संवेदनशील व्यक्ती आणि बालसाहित्यात मोठं योगदान देणारा साहित्यिक गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. डॉ. अनिता आणि अनिल अवचट यांच्या व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातील कार्याचा वसा यापुढे असाच पुढे सुरू राहील असे मुक्तांगणचे अध्यक्ष डॉ. आनंद नाडकर्णी यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
अल्प परिचय
केवळ साहित्य विश्वताच नाही तर समाजातही डॉ. अनिल अवचट यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात त्यांनी केली. व्यसनींना भरकटलेल्या मार्गावरून व्यसनमुक्त करत पूर्वायुष्यात आणण्याचं काम त्यांनी केलं. मुक्तांगण या संस्थेनं अनेक आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून रोखली. अनिल अवचट हे एक डॉक्टर होतेच मात्र त्यांनी समाज परिवर्तनाचाही विडा उचलला होता. समाजासाठी आपलं आयुष्य अर्पण करत त्यांनी अनेक कार्य केले.
पत्रकार म्हणून त्यांनी अनेक विषयांवर आपली मतं मांडली, त्यांच्या लेखणीतून, पुस्तकाद्वारे त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचले. शिल्पकला, चित्रकला, फोटोग्राफी आणि मुख्य म्हणजे ओरिगामीतून विविध आकार साकारणं हा त्यांचा आवडता छंद! केवळ स्वत:चा विचार न करता दुसऱ्यांसाठी सतत काही ना काही करत राहणारा परोपकारी असा त्यांचा स्वभाव आहे.
अनिल अवचट यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूरमध्ये झाला. त्यांनी एम.बी.बी.एस ची पदवीही पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. अनिल अवचट हे केवळ एक साहित्यिक नसून त्यांच्या अनेक ओळखी आहेत, त्यांचं बहुआयामी व्यक्तिमत्त्व त्यांनी केलेल्या विविध प्रकारच्या कामांमधून दिसून येतं.
१९६९ साली त्यांचं पहिलं-वहिलं पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध झालं, तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केलं. आतापर्यंत त्यांची बावीसहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.
मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचा जन्म
डॉ. अनिल अवचट यांचं लिखाण प्रभावी आहेच, मात्र त्यांचं समाजकार्यही तितकंच उल्लेखनीय आहे. अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक आहेत. त्यांनी पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची एक अनोखी पद्धत शोधली. जगभरातील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये त्यांची ही तकनिक वापरली जाते. मुक्तांगण परिवारातर्फे दरवर्षी डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार दिला जातो.
पत्रकार म्हणून समाजाशी अनिल यांची जवळीक आणखी वाढली, ते स्वतः पत्रकार असले तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला. त्यांनी आपल्या पत्रकारितेने समाजातील दुर्बल घटकांना मदत होईल असे कायम प्रयत्न केले. गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी त्यांनी कार्य केलं. अनिल अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी अनेक पुस्तकं लिहिली.
व्यसनमुक्ती क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार अनिल यांना सन्मानित करण्यात आलं. केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या कामाचं कौतुक केलं गेलं. अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना दिला गेला. पुढे महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार, फर्ग्युसन गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं.
सामाजिक अडचणींसोबत बालसाहित्यावरही डॉ. अनिल अवचट यांनी मोठ्या प्रमाणात लिखाण केलं. “सृष्टीत.. गोष्टीत” या त्यांच्या पुस्तकाला साहित्य अकादमीतर्फे उत्कृष्ट बालसाहित्याचा पुरस्कार देण्यात आला. इतकंच नाही तर अनिल अवचट यांची पुस्तकं सलग तीन वर्षे महाराष्ट्र शासनाने ‘सर्वोत्कृष्ट पुस्तके’ म्हणून जाहीर केली.
लेखक, डॉक्टर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते अशा अनेक ओळखी असताना त्यापैकी कोणती ओळख त्यांना जास्त भावते असं विचारलं असता डॉक्टर म्हणाले, येणाऱ्या पिढीने मला एक चांगला माणूस म्हणून ओळखावं असं म्हटलं. त्यांच्या या उत्तरातच त्यांचा नि:स्वार्थीपणा दिसून येतो. एक मराठी लेखक, डॉक्टर, समाजासाठी झटणारा कार्यकर्ता आणि पत्रकार असणाऱ्या अनिल अवचट यांनी महाराष्ट्राचं नाव आणखी उंचावलं. लिखाणाप्रमाणेच मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रामार्फत त्यांनी केलेले सामाजिक कार्यही बहुआयामी आहे. ते उत्तम कलाकार आहेत. त्यांची चित्रे, लाकडी शिल्पे, छायाचित्रे, ओरिगामी यांमधून त्यांचे कलाकौशल्य दिसते.
बालकुमार संमेलनाध्यक्षपदी निवड
अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या वतीने २८ वे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन पुस्तकांचे गाव भिलार (महाबळेश्वर, जि. सातारा) येथे दि. १८, १९ व २० जानेवारी २०१८ रोजी झाले.या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ बालसाहित्यिक अनिल अवचट यांची निवड करण्यात आली होती.
मसाप जीवनगौरव पुरस्कार
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा ‘मसाप जीवनगौरव पुरस्कार’ डॉ. अनिल अवचट (२०२१) यांना देण्यात आला.