राजकारण

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचे निधन

मंगळुरू : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार ऑस्कर फर्नांडिस यांचं आज मंगळुरूमध्ये निधन झालं. ते ८० वर्षाचे होते. जुलैमध्ये योगा करत असताना पडल्यामुळे त्यांना डोक्याला मार लागला होता. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने मेंदूमध्ये रक्त जमा झाले होते. त्यांच्यावर एक सर्जरीही करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधानावर काँग्रेससह विविध राजकीय पक्षांकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे.

फर्नांडिस यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरमय्या आणि डी. के. शिवकुमार त्यांना पाहण्यासाठी रुग्णालयात गेले होते. त्यांच्यावर होत असलेल्या उपचाराची माहितीही त्यांनी घेतली होती. फर्नांडिस यूपीए सरकारमध्ये केंद्रीय परिवहन मंत्री होते. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी राजीव गांधी यांचे संसदीय सचिव म्हणूनही काम पाहिलं होतं. ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष होते.

फर्नांडिस यांनी १९८० मध्ये कर्नाटकाच्या उड्डपी मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ते विजयी झाले होते. त्यानंतर याच मतदारसंघातून त्यांनी १९८४, १९८९, १९९१ आणि १९९६ मध्ये विजय मिळवला होता. १९९८ मध्ये ते राज्यसभेवर गेले होते. २००४ मध्ये पुन्हा त्यांची राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button