राजकारण

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिश रावत यांचा बंडाचा पवित्रा !

देहराडून : कॅप्टन अमरिंदर सिंग यांची नाराजी आणि बंडामुळे पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला असताना आता काँग्रेसचे अजून एक ज्येष्ठ नेते हरिश रावत हेही पक्ष आणि पक्षनेतृत्वावर असल्याचे दिसत आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री असलेल्या हरिश रावत यांनी पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच पक्षाविरोधात आघाडी उघडली आहे. रावत यांनी एका पाठोपाठ एक केलेल्या ट्विटमुळे उत्तराखंड काँग्रेसमध्ये काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत.

माजी मुख्यमंत्री असलेल्या हरिश रावत यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, अजबच गोष्ट आहे ना, निवडणूक रूपी समुद्रात पोहायचे आहे. सहकार्यासाठी संघटनेची चौकट बहुतांश ठिकाणी पाठ फिरवून उभी आहे किंवा नकारात्मक भूमिकेमध्ये आहेत. ज्या समुद्रात पोहायचे आहे. ज्यांच्या आदेशावर पोहायचे आहे. त्यांचे हस्तकच माझे हात-पाय बांधत आहेत. मनामध्ये खूप वेळा विचार येतो की, हरिश रावत आता खूप झालं. खूप पोहून झालं. आता आरामाची वेळ आलीय.

त्यानंतर हरिश रावत यांनी अजून एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात की, पुन्हा मनाच्या एका कोपऱ्यातून आवाज आला की, न दैन्यं न पलायनम् मी खूप उहापोहाच्या स्थितीत आहे. नवे वर्ष कदाचित मार्ग दाखवेल. मला विश्वास आहे की भगवान केदारनाथ या स्थितीत मला मार्गदर्शन करतील.

रावत यांच्या ट्विटनंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. काही मोठ्या नेत्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांचे हे ट्विट कोणत्यासंदर्भात आहे हे त्यांना माहिती नाही, असे सांगितले. दरम्यान, या प्रकारावरून भाजपला काँग्रेसवर निशाणा साधण्याची संधी मिळाली आहे. हरिश रावत हे उत्तराखंडमधील काँग्रेसचे अमरिंदर सिंह ठरू शकतात, असा टोला भाजपने लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button