मनोरंजनसाहित्य-कला

यंदा २ ते ६ फेब्रुवारी दरम्यान ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’

पुणे : आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा ६८ वा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ येत्या २ ते ६ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. महोत्सव मुकुंदनगर येथील कटारिया शाळेच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता अभिजात संगीतचा सोहळा असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या आयोजनाने व्हावी, या भावनेने या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीचे पालन करून महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष व भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी यांनी दिली. हा महोत्सव दरवर्षीप्रमाणेच दिमाखात आणि अभिजात संगीतातील अनेक नव्या जाणिवांसह यंदाही साजरा होणार आहे.

कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर रसिकांना उत्सुकता होती ती सवाई गंधर्व संगीत महोत्सवाची. पुणेकरांना जगभरातील शास्त्रीय संगीताच्या मांदियाळीत रमवणाऱ्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला परवानगी द्या, अशी महोत्सवाच्या आयोजकांनी राज्य सरकारकडे मागणी केली होती. त्यानुसार आता सवाई गंधर्व संगीत महोत्सव सर्व नियमांचे पालन करून होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

यंदाचे वर्ष पंडित भीमसेन जोशींचे जन्मशताब्दी वर्ष असल्यानं त्यांनी सुरू केलेला हा महोत्सव यावर्षी साजरा व्हावा, अशी पंडितजींचे पुत्र श्रीनिवास जोशी यांची इच्छा होती. इतर सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात येत असताना सवाई गंधर्व संगीत महोत्सवालादेखील ती मिळावी. सर्व नियमांचे पालन करून आपण त्याचे आयोजन करू, असे श्रीनिवास जोशी म्हणाले होते.

काही दिवसांपूर्वी ओमीक्रॉन व्हेरियंटचा वाढता धोका लक्षात घेत स्थानिक प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रमात केवळ २५ टक्के प्रेक्षकांनाच उपस्थित राहण्यास परवानगी दिली आहे. मात्र इतक्या अल्प प्रेक्षकांच्या उपस्थितीत कार्यक्रमांचे संयोजन कसे करायचे असा प्रश्न आयोजकांना पडला होता. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या आयोजनासाठी प्रशासनाने किमान ५० टक्के प्रेक्षक वर्गाला परवानगी द्यावी, असे मत आयोजकांनी व्यक्त केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button