परमबीर सिंगांवर ९ लाखांच्या खंडणीचा आणखी एक गुन्हा

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात परमबीर सिंग यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह, अल्पेश पटेल, विनय सिंह, रियाज पाटील अशी देखील नावं आहेत. विमल अग्रवाल नावाच्या एका व्यापाऱ्याने पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अग्रवाल यांनी तक्रारीत परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
माझं पार्टनरशिपमध्ये गोरेगाव इथे बोहो रेस्टॉरंट आणि बार आहे. अंधेरीमध्ये बीसीबी स्टोअर आणि बार आहे. हे दोन्ही चालू ठेवण्यासाठी सचिन वाझे आणि अन्य आरोपींनी ९ लाख रुपये घेतले होते. आरोपींनी जानेवारी- फेब्रुवारी २०२० पासून ते मार्च २०२१ या काळात ९ लाखांची वसूली केली आहे, असा आरोप अग्रवाल यांनी तक्रारीत केला आहे.
मुंबई पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहिता नुसार ३८४ ,३८५ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी याप्रकरणी सुमित सिंह याला अटक केली आहे. बोरीवली कोर्टाने आरोपीला २३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.
परमबीर सिंग यांच्यावर याआधी ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद अग्रवाल नावाच्या व्यक्तीने परमबीर सिंग यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. ठाणे शहरातील कोपरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात होता. परमबीर सिंग यांच्यासोबत संजय पुनामिया, सुनील जैन, मनोज घोटकर आणि डीसीपी पराग मणेरे असे सहआरोपी आहेत. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक फूलपगारे करत आहेत.




