ना लस, ना धोरण, बोलूच दिलं नाही; ममता बॅनर्जी यांचा पंतप्रधान मोदींवर संताप

नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यामध्ये महाराष्ट्रातील १७ जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश होता. याशिवाय यावेळी विविध राज्यांचाही समावेश होता. मात्र पश्चिम बंगालच्या एकाही जिल्हाधिकाऱ्यांनी हजेरी लावली नाही. स्वत: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच हजर होत्या. यावेळी ममता बनर्जींनी पंतप्रधान मोदींवरच हल्ला चढवला. केंद्राकडे ना कोणतं धोरण, ना कोणती उपाययोजना, असं असूनही बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलूच दिलं नाही, असा आरोप ममता बॅनर्जींनी केला. मोदींसोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनंतर ममता बॅनर्जींनी पत्रकार परिषद घेऊन हल्लाबोल केला.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, या बैठकीला दहा राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणून मी उपस्थित होते, त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांना या बैठकीला उपस्थित राहू दिलं नाही. मात्र भाजपचे मुख्यमंत्री सोडता इतर मुख्यमंत्र्यांना बोलूच दिलं नाही. भाजपचे काही मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदी यांनी आपआपले मुद्दे मांडले. मात्र आम्हाला बोलण्याची संधी मिळाली नाही. सर्व मुख्यमंत्री केवळ चूपचाप बसून होते. कोणीही काहीही बोललं नाही. आम्हाला व्हॅक्सीन अर्थात लसीची मागणी करायची होती, मात्र बोलूच दिलं नाही, असा आरोप ममता बॅनर्जींनी केला.
कोरोना कमी होत असल्यांच मोदी म्हणाले. मात्र आधीही असंच झालं होतं. आम्ही तीन कोटी लसीची मागणी करणार होतो. मात्र काहीच बोलू दिलं नाही. या महिन्यात २४ लाख लसी मिळणार होत्या, मात्र केवळ १३ लाख लसी मिळाल्या, असं ममतांनी सांगितलं.
पंतप्रधानांकडून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
– कोरोना व्हायरस अदृश्य आहे, रुपं बदलत असतो; त्यामुळे आपला दृष्टीकोन सातत्याने गतिशील आणि सुधारित असायला हवा.
– कोरोना व्हायरसच्या म्युटेशनमुळे तरुण, लहान मुलांबद्दल अधिक चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे आपण त्यासाठी तयार असणं आवश्यक आहे.
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कोविड संसर्गाची माहिती आणि त्यांच्या संबंधित जिल्ह्यातील तरुण तसंच मुलांमधील गांभीर्य याविषयी माहिती गोळा करण्यास सांगितलं आहे.
– लसीच्या अपव्ययाबाबत मोदींनी इशाराच दिला आहे. लसीचा एक डोसही वाया जाऊ नये असं मोदींनी म्हटलं. एक डोस वाया जाणं एखाद्याला आजारापासून संरक्षण नाकारल्यासारखं आहे.
केवळ नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा संवाद\
महाराष्ट्रातील १७ जिल्हाधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते. परंतु राज्यातून केवळ अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला. मराठवाड्यातील जालना, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी मात्र मोदींनी बातचीत केली नाही. यावेळी नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातील उपाययोजनांबाबत, आदर्शगाव हिवरेबाजार कसे कोरोनामुक्त झाले याची माहिती मोदींना दिली.




