संजय राऊत यांचे आता ‘ऑपरेशन बारामती’; पवारांचा गड भेदणार?
पुणे : बारामती म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ही दोन नावे आलीच. हा भाग राजकीय दृष्टीकोनातून पवार घराण्याचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्याला भेदणं म्हणजे मोठं जिकिरीचं काम असल्याचं म्हटलं जातं. पण हाच गड जिंकण्यासाठी तयारीला लागण्याची संकेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे दिले आहेत. बारामती हा महाराष्ट्राचाच भाग आगे. आपण तिथे जिंकू शकतो. आपण सकारात्मक राहायला हवं, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
संजय राऊत यांनी पुण्यात बोलताना शिवसेना तसेच पक्षविस्ताराबद्दल सविस्तर भाष्य केलं. पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार जिंकून येण्यासाठी आपण तयारीला लागलं पाहिजे असंदेखील त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं. बारामती आपली नाही, असं तुम्ही का गृहीत धरता. बारामतीही आपलीच आहे. बारामती महाराष्ट्राचा भाग आहे. संघटना वाढत राहिली पाहिजे. कदाचित आपण निवडणूक जिंकणार नाही. पण संघटनेची ताकद वाढायला हवी. कधी वाटलं होतं का आपण पुरंदरला जिंकू ? हासुद्धा बारामतीचाच भाग आहे. आपण जिंकू शकतो. आपण जिंकू शकतो ही सकारात्मक भावना ठेवली पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.
पक्षविस्ताराबद्दल बोलताना राऊत यांनी शिवसेना आग असल्याचं वक्तव्य केलं. शिवसेना आग आहे शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका, शिवसेना ही आग आहे. एकच सांगतो. उद्धव ठाकरे देशातील पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री बनले आहेत. तसा पक्षही पहिल्या क्रमांकाचा व्हावा, ही त्यांची भूमिका आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटकांना संघटनेत स्थान द्या. कोणतंही पद न स्वीकारता बाळासाहेब ठाकरे हे सत्ताधीश होते. मंत्री, आमदार, खासदार हे काही महत्त्वाचं नाही. पण पक्ष महत्त्वाचा आहे. मंत्रिपद येते आणि जाते. पण मग मला माजी म्हणू नका असं म्हणतात. आम्हाला कुणी माजी म्हणणार नाही, असं राऊत म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केलेली आहे. त्याबाबत संजय राऊत यांनी अनेकवेळा एकला चलो रेची भाषा बोलून दाखवली आहे. पुण्यात बोलतानादेखील त्यांनी जमलं तर आघाडी होईल नाहीतर आपलं एकला चलो रे आहे असं म्हणत पहिल्यांदाच बारामती जिंकण्याची भाषा केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.
या दौऱ्या दरम्यान राऊत यांचे भोसरी आणि वडगाव शेरी येथे भाषण झाले. या दोन्ही भाषणात संजय राऊत यांचे अजित पवार यांच्याबाबत बोललेले दोन सूर पाहायला मिळाले. संजय राऊत यांनी पिंपरी चिंचवडला जाऊन राष्ट्रवादीला डिवचण्याचं काम केलं. मात्र सायंकाळी वडगाव शेरी येथील भाषणात संजय राऊत बाजू सावरताना दिसले.
मुख्यमंत्री दिल्लीत गेल्याने लोक देव पाण्यात घालून बसले आहेत, ते मुंबईत परत आले आहेत. अमित शहांनाही भेटले. त्यांची कोणतीही वैयक्तिक चर्चा झाली नाही. ज्या शासकीय कामासाठी गेले होते तेवढेच काम करून परतले. पुढील तीन वर्षे पण उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असतील, असे राऊत यावेळी म्हणाले. अजित पवार आपलेच आहेत, एकत्र काम करायचंय. अजित दादांनी शिवसैनिकांना समजून घ्यावं. अजितदादा पवार या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्यासोबत आपण रीतसर बोलणी करू. मोठ्या पवार साहेबांना देखील बोलू. सन्मानीय आघाडी झाली तर उत्तमच आहे नाहीतर आपण आहोतच एकला चलो रे, असे बोलत राऊत यांनी संध्याकाळच्या सभेत मवाळ भूमिका घेतलेली पहायला मिळाली.
उपमुख्य मंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चांगले संबंध आहेत. पहाटेची घटना विसरली आहेत. तुम्हीही विसरून जा. साखर झोपेतील घटना विसरा. अजितदादांना भेटा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. अजितदादा आपली कामं करतील, असं विजय शिवतारे यांना सांगितलं.
शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी स्थानिक पातळीवर आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये ताळमेळ नसल्याचं विधान केलं होतं. त्यावर राऊत यांनी भाष्य केलं. इतरांसारखं शिवसेना कुणाला वाऱ्यावर सोडत नाही. विजय शिवतारे आम्ही तुमच्या मागे आहोत. युती होईल, महाविकास आघाडी होईल. सन्मानाने जागा वाटप झालं तर आपण एकत्र लढू, असं सांगतानाच युती, महाविकास आघाडीमध्ये भांड्याला भांड लागणार. हे नको असेल तर १५० जागा निवडून आणा. जो पर्यंत ते होत नाही तोपर्यंत गोड मानून घ्या, असं राऊत म्हणाले.