Top Newsराजकारण

एकमेकांचा सन्मान राखला पाहिजे; भुजबळ-सुहास कांदे वादावर राऊतांचा सल्ला

मुंबई: अन्न व नागरी पुरवठा छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या वादावर खा. संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यासाठी जसा समीर, पकंज आहे. तसाच सुहास आहे. त्यामुळे सर्व नेत्यांनी एकमेकांचा सन्मान राखला पाहिजे, असा सल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे.

संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना हा सल्ला दिला. या दोन्ही नेत्यांचा वाद विकोपाला जाणार नाही. दोन्ही महाविकास आघाडीचे नेते आहेत. एकमेकांचा सन्मान राखणं गरजेचं आहे. सुहास कांदे निवडून आलेले आमदार आहेत. त्यांचा सन्मान राखला पाहिजे. भुजबळ ज्येष्ठ आहेत. त्यांनी या सर्व आमदारांना मुलांप्रमाणे सांभाळलं पाहिजे. जसा पंकज, जसा समीर तसा सुहास कांदे. तरुण मुलं आहेत. सांभाळून घेतलं पाहिजे. यात कुठे चढाओढ अहंकार असता कामा नये. तरच महाविकास आघाडीची चाकं पुढे जातील, असं राऊत म्हणाले.

शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. छगन भुजबळांनी नियोजन समितीचा निधी विकल्याचा खळबळजनक आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. कांदे यांनी या प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी थेट न्यायालयातच धाव घेतली. या याचिकेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांनाही प्रतिवादी करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर छगन भुजबळांनी निधी विकल्याचे पाचशे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा कांदे यांनी केला आहे.

छगन भुजबळांनी निधी विकला; शिवसेना आमदाराची थेट हायकोर्टात धाव

महाविकास आघाडीच्या दोन नेत्यांमध्ये पुन्हा एकदा वाद उफाळला आहे. शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. छगन भुजबळांनी नियोजन समितीचा निधी विकल्याचा खळबळजनक आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.

आमदार कांदे यांनी या प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी थेट न्यायालयातच धाव घेतली. या याचिकेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांनाही प्रतिवादी करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर छगन भुजबळांनी निधी विकल्याचे पाचशे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात ऐन बैठकीत खडाजंगी झाली होती. त्यानंतर आता त्याचा पुढचा अंक थेट कोर्टात पाहायला मिळण्याची चिन्हं आहेत.

महिला अत्याचाराबाबत सरकार संवेदनशील

महिला अत्याचारांवरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर टीका केली होती. त्यावरही राऊत बोलले. सुधीरभाऊ खूप संवेदनशील आहेत. मला माहीत आहे. त्यांच्या भावनांचा नक्की विचार केला जाईल. आपल्या राज्यात महिलांवर अत्याचार व्हावेत असं कोणत्या सरकारला वाटतं? रावणालाही वाटत नसेल. रावणानेही सीतेवर अत्याचार केला नव्हता. सीतेला पळून नेलं. पण सन्मानाने सीतेला अशोक वनात ठेवलं. ही या भूमीची परंपरा आहे. इथे आपण स्त्रियांचा सन्मान राखतो. वाईट प्रवृत्तींच्या लोकांचा नाश करतो. महाराष्ट्रात महिलांचा नेहमीच सन्मान राखला गेला आहे. स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी आपण सर्वांनी कठोर पावलं टाकली आहेत. हे सर्वांना माहीत आहे. सुधीरभाऊंनाही माहीत आहे. महिलांवरील अत्याचाराबाबत सरकार संवेदनशील आहे, असं ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button