राजकारण

रामराज्यात पेट्रोल-डिझेलची दरवाढ शोभत नाही; संजय राऊतांचा खोचक टोला

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी इंधन दरवाढीवरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या व्यक्तव्याचा समाचार घेतला आहे. पेट्रोल-डिझेलची दरवाढ तुम्हाला धर्मसंकट वाटत असेल तर धर्माचे राजकारण करू नका, असं सांगतानाच पेट्रोल-डिझेलची दरवाढ रामराज्यात वावणाऱ्यांना शोभत नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

पेट्रोल-डिझेल धर्मसंकट वाटत असेल तर धर्माचे राजकारण करू नका. सत्ताही भाजपला श्रीरामाच्या नावावर म्हणजे धर्माच्या नावावर मिळाली आहे. राजकारणात धर्माला जास्त महत्त्व दिलं जात आहे, असं सांगतानाच लोकांची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पेट्रोल- डिझेल दरवाढ करणं. या दरवाढीसंदर्भातील धर्मसंकट यूपीए सरकारवरही होतं. पण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग नेहमी संकटाचा सामना करायचे. तुम्ही तर पळ काढत आहात, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे. राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

देशातील जनतेचे महागाईपासून रक्षण करणं हे कुठल्याही सरकारचं काम आहे. व्यापारात फायदा होतो की तोटा हे बघायला सरकार बसलेलं नाही. आपण रामराज्यात राहतो. पण बाजूला असलेल्या सीता आणि रावण यांचा जन्म झालेल्या देशात म्हणजे नेपाळ आणि श्रीलंकेत पेट्रोल डिझेल स्वस्त आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलची दरवाढ रामराज्यात वावरणाऱ्यांना शोभत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामींनी राम, रावण आणि सीतेच्या जन्मस्थळांचा उल्लेख करून ट्विट करत ही टीका केली आहे. प्रभू रामाच्या भारतात पेट्रोलचे भाव सर्वाधिक आहेत. तर शेजारीच असलेल्या नेपाळ आणि श्रीलंकेत हे दर कमी आहेत, असं स्वामींनी म्हटलं होतं. प्रभू रामाच्या भारतात पेट्रोलची किंमत प्रति लिटर 93 रुपये आहे. सीतेच्या नेपाळमध्ये पेट्रोलची 53 रुपये आहे. तर रावणाच्या लंकेत पेट्रोलचे भाव 51 रुपये आहेत, असा टोला सुब्रमण्यम स्वामींनी लगावला होता.

डिसेंबरमध्येही स्वामींनी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपला घेरले होते. त्यांनी ट्विट करून भाजपवर टीका केली होती. यावेळी पेट्रोलची किंमत प्रति लिटर 90 रुपये आहे. पेट्रोलची एक्स रिफायनरी किंमत 30 रुपये प्रति लिटर आहे. त्यावर तेलावर 60 रुपयांचा टॅक्स जोडण्यात आला. खरं तर पेट्रोलचे दर जास्तीत जास्त 40 रुपये प्रति लिटर असायला हवेत, असं स्वामींनी म्हटलं होतं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button