मराठा मोर्चा ही वादळापूर्वीची शांतता; संभाजीराजेंचा फेसबुक पोस्टमधून इशारा

पुणे: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या १६ तारखेला कोल्हापुरातून मोर्चाची हाक दिल्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना जाहीरपणे भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला आणि जबाबदारी स्वीकारा, असे संभाजीराजे यांनी या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता राज्यातील मराठा आमदार आणि खासदार मराठा आरक्षणासंदर्भात काही निर्णायक भूमिका घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे यांनी नाशिकच्या पत्रकार परिषदेत मराठा लोकप्रतिनिधींना इशारा दिला होता. मराठा आरक्षणासंदर्भात मी भूमिका मांडल्यानंतर राठा आमदार आणि खासदारांनी माझं-तुझं केलं तर बघा, असा इशाराही संभाजीराजे छत्रपती यांनी दिला होता. त्यामुळे आता संभाजीराजे यांच्या फेसबुक पोस्टमुळे मराठा लोकप्रतिनिधींवरील दबाव वाढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.