समाजवादी पक्षाचे खा. आझम खान यांची मेदांता रुग्णालयात रवानगी
लखनऊ : समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांना सीतापूर तुरुंगातून लखनऊमधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तुरुंगात कोरोना संसर्ग झाल्यानंतर प्रकृती ढासळल्याने आझम खान यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेण्यात आला. आझम खान यांचा धाकटा मुलगाही कोरोनाग्रस्त असून त्यालाही मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आझम खान यांना सध्या ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. खान यांच्यावर क्रिटिकल केअर टीम देखरेख करत आहे, अशी माहिती मेदांता हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. राकेश कपूर यांनी दिली. गेल्या आठवड्याभरापासून त्यांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यांना ४ लीटर ऑक्सिजनवर ठेवण्यात आल्याचं कपूर यांनी सांगितलं. त्यांची ऑक्सिजन लेव्हल ९० च्या आसपास असून उपचार सुरु असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं.
आझम खान यांचा धाकटा मुलगा मोहम्मद अब्दुल्ला खान यालाही कोरोनाने ग्रासले आहे. मात्र त्याची प्रकृती स्थिर आहे. परंतु त्यालाही डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. रविवारी अचानक प्रकृती बिघडल्यानंतर आझम खान यांना कडेकोट पोलिस बंदोबस्तात सीतापूर तुरुंगातून लखनौमधील मेदांता रुग्णालयात आणण्यात आले.
आझम खान सध्या उत्तर प्रदेशातील सीतापूर तुरुंगात कैद आहेत. त्यांच्यावर ५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. आझम खानसोबत तुरुंगात कैद आणखी १३ कैद्यांनाही कोरोना संसर्ग झाल्याचं नुकतंच समोर आलं होतं. आझम खान तुरुंगातही रमझानचे रोजे ठेवत होता. मात्र प्रकृती बिघडल्यानंतर आझम खानने रोजे ठेवणेही बंद केल्याची माहिती तुरुंग प्रशासनाने दिली. बेताल वक्तव्यांसाठी खासदार आझम खान कुप्रसिद्ध आहेत. लोकसभा अध्यक्ष म्हणून काम पाहत असलेल्या भाजप खासदार रमा देवी यांना उद्देशून तुम्ही खुप सुंदर दिसता, तुम्ही एवढ्या सुंदर आहात की तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलावंसं वाटतं, असं वक्तव्य आझम खान यांनी काही वर्षांपूर्वी केलं होतं. तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रतिस्पर्धी उमेदवार आणि प्रख्यात अभिनेत्री जया प्रदा यांच्यावरही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.