सचिन वाझे, परमबीर सिंग खंडणीखोरच ! नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना वसुलीच्या आरोपामध्ये कसं फसवण्यात आलं हे सांगताना अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी मोठा दावा केलाय. त्यांनी माध्यमांना याबाबत सविस्तर माहिती दिलीय. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे तसेच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुंबईमध्ये खंडणीचा धंदा सुरु केला होता. तसेच भाजपच्या मदतीने देशमुख यांच्याविरोधात इमेलद्वारे तक्रार करण्यात आली, असा आरोप मलिक यांनी केलाय. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांनी मुंबईमध्ये खंडणीचा धंदा सुरु केला होता. तसेच उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटीलियासमोर बॉम्ब ठेवण्यात आला. हे काम सरकारला अंधारात ठेवून केले गेले. विधानसभेत जेव्हा प्रश्न आला तेव्हादेखील मुंबई आयुक्तांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती दिली. सगळी माहिती समोर आल्यानंतर आयुक्ताची बदली करण्यात आली, असा दावा मलिक यांनी केला.
बोलताना नवाब मलिक यांनी भाजपवरदेखील गंभीर आरोप केला आहे. बदलीनंतर हे प्रकरण पुढे जाईल आणि तपास सुरु होईल हे कळल्यानंतर भाजपच्या मदतीने अनिल देशमुख यांच्याविरोधात ईमेलद्वारे तक्रार करण्यात आली. या तक्रारीनंतर काही लोकांनी सीबीआयमार्फत याचा एफआयआर दाखल करुन घेतला. एफआयआर दाखल केल्यानंतर अनिल देशमुख यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तुम्ही कितीही आम्हाला त्रास द्या. जे काही तुम्ही करत आहात, त्याचे उत्तर आम्ही देऊ, असे सांगितले आहे, असे नवाब मलिक म्हणाले. तसेच देशमुख यांना अडकविण्यासाठी फर्जीवाडा करण्यात आला. जो तक्रारदार आहे, तोच आता फरार झालेला आहे. हे लोक पाहत आहेत. आज ना उद्या यातील सत्यता कोर्टाच्या समोर येईल, असेही मलिक यांनी स्पष्ट केले.