सचिन वाझेंकडेच ‘ती’ स्कॉर्पिओ चार महिने होती : फडणवीस
मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी केली आहे. सगळे पुरावे असताना सचिन वाझे यांना अटक का होत नाही असा सवाल फडणवीस यांनी केला. सचिन वाझे यांनी आपल्या पतीला अटक करून घे असे सांगितले होते असे मनसुख हिरेन यांच्या पत्नीने आपल्या तक्रारीत म्हटले होते. त्यामुळेच अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी मनसुख हिरेन यांचा प्रयत्न सुरू होता. माझे पती हे दबावात होते, त्यामुळेच आपल्याला चांगला वकील मिळावा अशी मागणीही त्यांनी भावाकडे केली होती. या सगळ्या प्रकरणात महत्वाची अशी स्कॉर्पिओ गाडीही सचिन वाझे यांच्याकडे चार महिने होती असा खळबळजनक खुलासा फडणवीस यांनी सभागृहात केला.
सीडीआर मिळवल्या प्रकरणात माझी चौकशी करा : फडणवीस
मनसुख हिरेन प्रकरणात फक्त खूनीच शोधणार नाही, तर त्यापलीकडीलही माहिती मिळवेन, माझा अधिकार आहे तो. मी सीडीआर मिळवला, माझी चौकशी करा असे सांगत फडणवीस आक्रमक झाले. नाना पटोले मला धमकी देतात, मी घाबरत नाही असे सांगत त्यांनी आपली चौकशी करण्याचे आव्हान सत्ताधाऱ्यांना दिले.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मंगळवारी मनसुख हिरेन प्रकरणाच्या निमित्ताने सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांच्यातील संभाषणाचा सीडीआर देवेंद्र फडणवीस यांना मिळालाच कसा ? असा सवाल केला होता. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओत सापडलेले जिलेटीन ही स्फोटके नव्हती ही माहिती फडणवीस यांना मिळाली कशी ? हा सगळा प्लॅन कोणी केला असाही सवाल नाना पटोले यांनी केला. त्यावर मी सीडीआर मिळवला, माझी चौकशी करा असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले. आधी ज्यांनी खून केला त्यांची चौकशी करा असेही फडणवीस म्हणाले. सीडीआर प्रकरणावर विरोधकांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
महाराष्ट्र हे आता आत्महत्येचं डेस्टिनेशन होतंय का?
रायपूर येथील सरकारी अधिकाऱ्यानं नागपूरात येऊन केलेली आत्महत्या आणि दादरा नगर हवेलीचा भाजप खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत केलेल्या आत्महत्येवरुन राज्याच्या विधानसभेत जोरदार गदारोळ झाला. भाजपचं प्रशासन असलेल्या राज्यातील लोक महाराष्ट्रात येऊन आत्महत्या करत आहेत आणि महाराष्ट्र सरकारकडून न्याय मिळेल या आशेनं आरोपींवर कारवाई करण्याची मागणी सुसाईड नोटमध्ये करत आहेत, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं. यावेळी अनिल देशमुख यांनी रायपूर मध्य प्रदेशात येत असल्याचा उल्लेख केला. देशमुखांच्या याच दावाच्या धागा पकडून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार शरसंधान केलं आहे.
“राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची माहिती करुन घ्यावी की रायपूर हे मध्य प्रदेशात नव्हे, तर छत्तीसगडमध्ये येतं आणि तिथं काँग्रेसचं सरकार आहे. महाराष्ट्रात येऊन लोक आत्महत्या करत आहेत याची खुशी गृहमंत्र्यांना होत असेल तर हा महाराष्ट्र आता पर्यटनाचा नव्हे, तर आत्महत्येचं डेस्टिनेशन होतोय का? याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी द्यावी”, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.