Top Newsराजकारण

भूपेंद्र पटेल आज दुपारी १ वाजता घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

गांधीनगर : पहिल्यांदाच आमदारपदी निवडून आलेले भूपेंद्र पटेल यांची गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून राज्य भाजप विधिमंडळ पक्षाच्या रविवारी झालेल्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली. पटेल आज सोमवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. भूपेंद्र पटेल हे घाटलोदिया मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले असून सोमवारी दुपारी १ वाजता ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

विजय रुपानी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर हालचालींना वेग आला होता. नाराज असलेल्या पटेल समुदायाचे समाधान करण्यासाठी भूपेंद्र पटेल यांची निवड केल्याचे सांगण्यात आले. भूपेंद्र पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय आहेत. पुढच्या वर्षी गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत विजय रुपानी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला विजय मिळणे शक्य नाही, असा निष्कर्ष पक्षाच्या सर्वेक्षणातून समोर आला होता. पक्षात रुपानी यांच्याविषयी नाराजी होती. ते राज्यातील कोरोना स्थिती नीटपणे हाताळण्यात अयशस्वी ठरल्याने त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास श्रेष्ठींनी सांगितले. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नवे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांच्या नावाचा प्रस्ताव विजय रुपानी यांनीच मांडला व तो एकमताने संमत झाला.

गुजरातचे भावी मुख्यमंत्री म्हणून मनसुख मांडवीय, उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांसह काही जणांची नावे शर्यतीत होती. भूपेंद्र पटेल यांचे नाव अजिबात चर्चेत नव्हते. अशाच नावाची निवड करून भाजपचे आपले धक्कातंत्र कायम ठेवले आहे.

विकासाला नवी ऊर्जा मिळेल : अमित शहा

पटेल यांची गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, गुजरातच्या विकास प्रक्रियेला पटेल यांच्या निवडीमुळे नवी ऊर्जा मिळेल. येथील जनकल्याणाची कामे ते आणखी जोमाने पुढे नेतील.

नितीन गडकरी यांचीही सहमती

भूपेंद्र पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यापूर्वी अमित शहा यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली. या नावाला गडकरी यांनी सहमती दिल्याचे समजते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button