‘मुंबई मॉडेल’ यशस्वी असेल तर लॉकडाऊन कशाला वाढवला : आ. नितेश राणे

मुंबई : गाजावाजा केले जाणारे ‘मुंबई मॉडेल’ यशस्वी असेल तर लॉकडाऊन ३१ मे पर्यंत का वाढवण्यात आला, असा सवाल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला. ठाकरे सरकार कोरोनाचे खरे आकडे लपवत आहे. त्यांना राज्यातील परिस्थिती गंभीर असल्याची जाणीव आहे. बेडस आणि ऑक्सिजनचा अजूनही तुटवडा आहे. त्यामुळे ठाकरे सरकारमध्ये लॉकडाऊन हटवण्याची हिंमत नाही, असाही आरोप त्यांनी केला.
नितेश राणे यांनी गुरुवारी मुंबईत एक वृत्तवाहिनीशी बोलताना सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या खरोखरच कमी झाली असती तर अनलॉक व्हायला हवे होते. दुकाने आणि इतर व्यवहार सुरु करायला परवानगी दिली पाहिजे होती. पावसाळ्याला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. मग उरलेल्या १५ दिवसांत लोकांना पैसे कमवू द्यायचे होते. मात्र, मुळातच मुंबई मॉडेल फसवे असल्यामुळे ठाकरे सरकारने लॉकडाऊन वाढवला आहे.
ठाकरे सरकार कोरोनाची खरी परिस्थिती लपवण्यासाठी आणि आपल्या इमेज मेकिंगसाठी बॉलिवूड कलाकारांकडून ट्विट करवून घेते. त्यासाठी शिवसेना भवनावरून अनेक कलाकारांना फोन केले जातात, असा आरोपही नितेश राणे यांनी केला. सरकारी तिजोरीत खडखडाट असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोशल मीडिया अकाऊंटस सांभाळण्यासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते. तसेच सरकारने आपल्या इमेज मेकिंगसाठी रेन ड्रॉप या एजन्सीला काम दिले आहे. ही एजन्सी दिशा पटानी, करिना कपूर, कतरिना कैफ, फरहान खान यांच्यासारख्या अनेक कलाकारांच्या संपर्कात आहे. तुम्ही करिना कपूर किंवा कतरिना कैफ यांची अलीकडची ट्विटस बघा. या बॉलिवूड सेलिब्रिटींकडून पैसे देऊन ट्विट करवून घेतले जात आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले.
आगामी अधिवेशनात मी सर्वांना उघडं पाडणार आहे. कोणाला आतापर्यंत किती पैसे देण्यात आलेत, किती बिलं झालेत, हे सर्व मला माहिती आहे. छोट्या कलाकारांना ट्विट करण्यासाठी साधारण तीन लाख आणि बड्या कलाकारांना त्यापेक्षाही जास्त रक्कम मिळते. त्यासाठी थेट सेनाभवनातून या बॉलिवूड सेलिब्रिटींना फोन केले जातात, असा आरोप नितेश राणे यांनी केला.




