राजकारण

चंद्रकांत पाटलांना मानसिक उपचारांची गरज; अशोक चव्हाणांचे जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी भाजपमध्ये चांगलंच राजकारण रंगलंय. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात तर जोरदार चिखलफेक सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशोक चव्हाण यांनी औकातीत राहावं असा दम चंद्रकांत पाटील यांनी भरला आहे. त्याला आता अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलंय. चंद्रकांत पाटील यांना मानसिक उपचारांची गरज असल्याचा टोला चव्हाण यांनी लगावला आहे.

सत्ता गेल्याचे नैराश्य, पुन्हा सत्ता मिळत नसल्याची हतबलता आणि मराठा आरक्षणाच्या ‘फुलप्रुफ’तेचा सर्वोच्च न्यायालयात भंडाफोड झाल्याने चंद्रकांत पाटील यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळेच ते सतत बेताल विधाने करीत असून, त्यांनी चांगले मानसिक उपचार घेण्याची नितांत गरज असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केलीय. भाजपला सत्ता गेल्याचे नैराश्य होतेच. सतत तारखा देऊन महाविकास आघाडी सरकार अस्थिर होत नसल्याने हतबलताही आलेली होती. वरून मराठा आरक्षणाबाबत भाजपने केलेल्या खोट्या दाव्यांचा सर्वोच्च न्यायालयानेच भंडाफोड केल्याने चंद्रकांत पाटील सैरभैर झाले आहेत. या प्रचंड ताणतणावामुळे नेमके काय बोलावे, हे कळेनासे झाल्याने शब्द निवडताना सतत त्यांचा तोल सुटतो आहे. पण योग्य मानसिक उपचारातून या समस्येवर नक्कीच मार्ग निघू शकेल, अशी अपेक्षा असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय.

चंद्रकांत पाटलांची दमबाजी

चंद्रकांत पाटलांना मराठा आरक्षण कायद्यातील काय कळतंय? ते काहीही चुकीची माहिती देत असतात, या सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अशोक चव्हाणांनी औकातीत राहावं, असा दमच चंद्रकांत पाटलांनी भरला आहे. मीडियाशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. अशोक चव्हाणांनी केंद्र सरकारवर बोट दाखवू नये. त्यांनी स्वत: राज्यासाठी काही तरी करून दाखवावं. चव्हाणांनी औकातीत राहावे. त्यांची औकात काय आहे हे आम्हाला माहीत आहे. आम्ही काय करावं ते आम्हाला सांगू नये, असं पाटील म्हणाले.

मराठा समाजासाठी पॅकेज जाहीर करा

मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ३ हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात यावं, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा आणि ओबीसींसाठी जाहीर केलेल्या सवलतीही लागू करा, अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. फडणवीस सरकारने ज्या सवलती मराठा-ओबीसी समाजाला जाहीर केल्या होत्या. त्या सवलती तातडीने मराठा-ओबीसींना तातडीने द्याव्यात, असं सांगतानाच सारथीसाठी महिन्याभरात अजित पवारांनी काय केलं? असा सवालही त्यांनी केला. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची कर्ज मर्यादा २५ लाख करा. अजितदादांनी सांगितल्याप्रमाणे ऑन दी स्पॉट निर्णय घ्या, अण्णासाहेब पाटील महामंडळाला स्वायत्तता द्या, अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button