राजकारण

पोलीस अधिकाऱ्यांच्या राजकीय निष्ठा तपासणार : वळसे-पाटील

गृहमंत्रिपदी विराजमान होताच सूचक इशारा

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी आज राज्याच्या गृहमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतली. यावेळी नवनिर्वाचित गृहमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दिलीप-वळसे पाटील यांनी सध्याचा काळ कठीण असून प्रशासकीय कामात कोणताही हस्तक्षेप न करता मला देण्यात आलेली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करेन अशी ग्वाही दिली. यासोबतच त्यांनी राजकीय निष्ठा बाळगणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांबाबतच्या प्रश्नावरही सूचक विधान केलं आहे.

पोलीस दलामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित अधिकारी असून ते निष्ठा बाळगून काम करत असल्याबाबत दिलीप वळसे-पाटील यांना विचारण्यात आलं. कुणाची निष्ठा काय आहे, कुणावर आहे हे येत्या काळात तपासून पाहिलं जाईल. योग्य ती माहिती घेतली जाईल आणि त्यावर निर्णय घेतला जाईल, असं दिलीप-वळसे पाटील म्हणाले.

मुंबई हायकोर्टानं परमबीर सिंग प्रकरणी दिलेल्या सीबीआय चौकशीच्या निकालाला राज्य सरकार सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याची महत्वाची माहिती देखील यावेली दिलीप वळसे-पाटील यांनी यावेळी दिली. यासोबतच कोर्टानं दिलेल्या आदेशानुसार सीबीआय असो किंवा एएनआय असो सर्व यंत्रणांना संपूर्ण सहकार्य केलं जाईल, असंही ते म्हणाले.

गृहमंत्रिपदी आता नवा वसुली मंत्री कोण? अशी भाजपकडून करण्यात आलेल्या टीकेबाबत बोलताना दिलीप वळसे-पाटील यांनी कुणी काय आरोप करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पारदर्शक कारभार महाराष्ट्राला देण्याचा माझा प्रयत्न आहे, असं म्हटलं. येत्या काही दिवसांत सचिव अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button