राजकारण

सर्व भारतीयांचा डीएनए एकच, सीएएला कोणत्याही मुस्लिमाचा विरोध नाही : मोहन भागवत

गुवाहाटी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी देशातील प्रत्येक भारतीयाचा डीएनए एकच असल्याचं वक्तव्य केलं होतं. आता आसाममध्ये मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना देशात सीएए कायद्यामुळे कोणत्याही मुस्लीम व्यक्तीला त्रास होणार नाही, असं विधान केलं आहे. सीएए आणि एनआरसी यांचा हिंदू-मुस्लीम विभाजनाशी कोणताही संबंध नाही. राजकीय फायद्यासाठी काही लोकांकडून याला धार्मिक रुप दिलं जात आहे, असंही भागवत म्हणाले.

मोहन भागवत दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आहेत. आसामच्या विविध क्षेत्रात आणि अरुणचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरासारख्या इतर पूर्वोत्तमर राज्यांमध्ये संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत मोहन भागवत यांनी बैठक घेतली. या बैठकीत संघटनेशी संबंधित तसेच कोरोना महामारी संदर्भात समाज कल्याण कामांचा आढावा व उपायांवर चर्चा करण्यात आल्याचं भागवत यांनी सांगितलं.

भारताला विविधतेची देणगी मिळाली आहे. हा इतिहास आपल्यासोबत आज नव्हे, तर ४ हजार वर्षांपासून चालत आला आहे. इतक्या साऱ्या विविधतेचे लोक इथं शांतीनं नांदतात हे जगाच्या पाठिवर इतर कुठेच पाहायला मिळणार नाही. देशातील कोणत्याही विविधतेशी आपल्याला विरोध नाही. देशात विविध राज्य आहेत. नागरिक काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सहजतेनं प्रवास करत होते. पण समस्या तेव्हा निर्माण झाली जेव्हा सांगितलं जाऊ लागलं की इथं एकच देव चालणार, एकच पद्धत चालेल. १९३० सालापासून योजनाबद्ध पद्धतीनं मुस्लीमांची लोकसंख्या वाढविण्याची मोहीम सुरू झाली. काही प्रमाणात ते सत्य देखील ठरलं आणि पाकिस्तानची निर्मिती झाली. पण आसाम मिळालं नाही, बंगाल मिळालं नाही, कॉरिडोर मागितला तो मिळाला नाही मग जे मिळालं त्यात समाधान मानलं आणि आता आणखी कसं मिळवलं जाईल याचे प्रयत्न सुरू आहेत, असं भागवत म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button