फोकस

मालाड दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये; मुख्यमंत्र्यांकडून जखमींची विचारपूस

मुंबई : मालाड मालवणी येथे इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची तसेच जखमीच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या दुर्घटनेबद्धल मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोक व्यक्त केला तसेच जखमी रहिवाशांची कांदिवली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालय (शताब्दी रुग्णालय) येथे जाऊन विचारपूस केली. यावेळी पालक मंत्री आदित्य ठाकरे, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, महापौर किशोरी पेडणेकर, जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर हे उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी काल रात्रीच या घटनेची माहिती मिळताच पालिका आयुक्तांशी चर्चा केली तसेच मदत व बचाव कार्य काळजीपूर्वक पार पाडण्याचे निर्देश दिले.अग्निशमन दल, महानगरपालिकेची पथके, पोलीस हे रात्रीपासून बचाव कार्य करीत होते. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेतील जखमींवर तातडीने रुग्णालयांत हलवून शासनाच्या खर्चाने उपचार करावेत हे निर्देशही दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button