राजकारण

रोहित पवारांकडून संभाजीराजेंच्या भूमिकेचे स्वागत, तर चंद्रकांत पाटलांना टोला

अहमदनगर: भाजपला शह देण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याशी जवळीक वाढविण्याचे जोरदार प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरू असल्याचे दिसून येते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतली. तर इकडे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी संभाजीराजेंच्या मराठा आरक्षणासंबंधीच्या भूमिकेचे स्वागत केले. एवढ्यावरच पवार थांबले नाहीत तर भाजपचे चंद्रकांत पाटील यांचे नाव ने घेता त्यांवरही निशाणा साधला. ‘कोणीतरी सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा पेपरमध्ये बातम्या याव्यात यासाठी काही वक्तव्य करत असेल किंवा यामध्ये राजकारण करू पाहत असेल, तर हे योग्य नाही,’ असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

कर्जत येथे रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सध्या सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पवार यांना मराठा आरक्षणा, त्यावरील संभाजीराजे यांची भूमिका, राष्ट्रवादीची भूमिका या अनुषंगाने प्रश्न विचारले. यावर बोलताना पवार म्हणाले, ‘छत्रपती संभाजी महाराज यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुढाकार घेतला असून तो योग्य आहे. या प्रश्नावर सत्ताधारी किंवा विरोधक यापैकी कोणीही राजकारण करू नये. युवकांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. कोणीतरी एक व्यक्ती पुढाकार घेत असेल तर त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकार या दोघांशी संपर्क ठेवणे सोपे होईल. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे. राज्य सरकारसोबत त्यांची चर्चा सुरू आहे. मात्र कोणीतरी सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा पेपरमध्ये बातम्या याव्यात या हव्यासापोटी काही वक्तव्य करत असेल किंवा यामध्ये राजकारण करू पाहत असेल, तर हे योग्य नाही. त्यांनी असे करू नये. उलट या प्रश्नावर सर्वांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू या, असे आवाहनही पवार यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button