कोविड केंद्रातील ‘झिंगाट’ डान्सवरुन दरेकरांच्या टीकेला रोहित पवारांचे प्रत्युत्तर
मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील गायकरवाडीच्या कोविड केंद्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कोरोना रुग्णांसोबत झिंगाट गाण्यावर जोरदार डान्स केला. त्यांचा हा डान्स सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, रोहित पवारांच्या या डान्सवरुन विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार टीका केलीय. “पीपीई किट न घालता रोहित पवारांनी डान्स केला. शरद पवार यांचे नातू आहेत, म्हणून रोहित पवारांना दुसरा न्याय का?” असा सवाल दरेकर यांनी विचारलाय. त्यावर आता रोहित पवार यांनीही जोरदार प्रत्युतर दिलं आहे.
“सन्माननीय प्रवीण दरेकर साहेब कोविड सेंटरमधली माणसं माझ्या कुटुंबातली असून त्यांच्यासाठी कितीही केलं तरी ते कमी आहे. त्यामुळं शक्य ते सगळं करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. अगदी पहिल्या दिवसापासून मी त्यांची काळजी घेतो. त्यांना काल एकच दिवस भेटलो असं नाही तर नेहमीच भेटतो. माझ्या मतदारसंघातले अधिकारी आणि नागरिकही या रुग्णांची जमेल तशी सेवा करतात. कोविडमुळं खचलेल्या रुग्णांना माझ्या भेटीमुळं धीर येत असेल, त्यांच्या आनंदात दोन मिनिटं सहभागी झाल्याने तो द्विगुणित होत असेल तर त्यात गैर काय? त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच माझ्यासाठी आनंद आहे,” असं रोहित पवार म्हणाले.
आणि हो… ५ वी नापास झालेल्या गुजरातमधल्या एका आमदारासारखं मी रुग्णाला इंजेक्शन दिलं नाही. तसंच आपल्याही पक्षाचे अनेक नेते पीपीई किटशिवाय रुग्णांना भेटले, तेंव्हा त्यांच्या निदर्शनास आपण ही गोष्ट आणून दिल्याचंही काही दिसलं नाही! असं का?
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 25, 2021
त्याचबरोबर “५ वी नापास झालेल्या गुजरातमधल्या एका आमदारासारखं मी रुग्णाला इंजेक्शन दिलं नाही. तसंच आपल्याही पक्षाचे अनेक नेते पीपीई किटशिवाय रुग्णांना भेटले, तेंव्हा त्यांच्या निदर्शनास आपण ही गोष्ट आणून दिल्याचंही काही दिसलं नाही! असं का?”, असा सवालही रोहित पवार यांनी दरेकरांना विचारलाय.
“रोहित पवार यांनी एका कोव्हिड सेंटरवर जाऊन कोव्हिड प्रोटोकॉलचा भंग केला, तो निषेधार्ह आहे. कोणतंही पीपीई किट न घालता ते गेले, त्यामुळे ते सुपर स्प्रेडर ठरु शकतात. सर्व सामन्य नागरिकांना एक न्याय आणि रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत म्हणून त्यांना दुसरा न्याय का, असा प्रश्न निर्माण होतो. कुणीही लोक प्रतिनिधी असो, त्यांनी गांभीर्याने या गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे” असं प्रवीण दरेकर म्हणाले होते.
गायकरवाडी (कर्जत) येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांमध्ये असलेलं गंभीर वातावरण हलकंफुलकं करण्यासाठी गायक तुषार घोडके यांचा गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. यावेळी त्यांच्या 'झिंगाट' गाण्यावर तिथल्या आजींनीही ठेका धरला आणि आणि नकळत मीही त्यांच्यात सहभागी झालो. pic.twitter.com/EuniVa8FU6
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 24, 2021
कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोव्हिड केअर सेंटरला कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी भेट दिली. यावेळी रुग्णांशी संवाद साधत त्यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला. रुग्णांचे मनोबल वाढावे तसंच त्यांना मनोरंजन म्हणून गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रोहित पवार रुग्णांच्या चेहऱ्यावरील ताण दूर करण्यासाठी त्यांच्यासोबत झिंगाट गाण्यावर थिरकताना पाहायला मिळालं. यावेळी कोरोना रुग्णही भारावल्याचं चित्र दिसलं.