मनोरंजन

भाजपच्या चित्रपट आघाडीचा पुणे शहराध्यक्ष रोहन मंकणीला अटक

पुणे : प्रसिद्ध सिने अभिनेते रवींद्र मंकणी यांचा मुलगा (Actor Ravindra Mankani’s Son) आणि भाजपच्या चित्रपट आघाडीचा शहराध्यक्ष रोहन मंकणी (Rohan Mankani arrested) याला सायबर सेलने अटक केली आहे. मंकणी याच्यासह एका महिला आणि इतर 7 जणांना अटक करण्यात आली आहे. बँकेच्या खात्यांची माहिती चोरून विकण्याच्या प्रयत्नात ही कारवाई करण्यात आली आहे.

बँकेमध्ये असलेल्या डोरमंट (निष्क्रीय खाते) खात्यांचा डेटा मिळवून त्याद्वारे अब्जावधीची फसवणूक करणारी आंतरराज्य टोळीला सायबर पोलिसांनी जेरबंद केलं आहे. याप्रकरणात आतापर्यंत सायबर पोलिसांनी एका महिलेसह 8 जणांना अटक केली आहे. भाजपचा चित्रपट आघाडीचा शहराध्यक्ष व अभिनेते रवींद्र मंकणी यांचा पुत्र रोहन मंकणीचाही त्यात समावेश आहे.

आरोपींनी संगनमत करून काही नामांकित बँकातील डोरमंट अकाउंट (निष्क्रिय खाते) आणि काही अॅक्टिव्ह बँक खात्याची माहिती अनधिकृतपणे मिळवली होती. सर्व बँक खात्यात जवळपास 216 कोटी 29 लाख रुपये होते. ही पूर्ण माहिती चोरल्यानंतर आरोपी ते एकाला विक्री करणार होते, पण त्याची माहिती सायबर सेलला मिळाली. त्यानंतर सायबर पोलीस आठ दिवसापासून टोळीच्या मागावर होते. त्यानुसार पथकाने त्यांना काल सिंहगड रोड परिसरात ताब्यात घेतले.

रोहन रवींद्र मंकणी (वय 37, रा. सहकारनगर), सुधीर शांतीलाल भटेवरा ऊर्फ जैन (वय 54, रा. सिहंगड रोड), रवींद्र महादेव माशाळकर (वय 34, रा. अंबाजोगाई रोड, बीड), आत्माराम कदम (वय 34, रा. मुंबई), मुकेश मोरे (वय 37, रा. येरवडा), राजेश ममीडा (वय 34, रा. हैदराबाद), विशाल बेंद्रे (वय 45, रा. वाशीम) राजेश मुन्नालाल शर्मा (वय 42, रा. औरंगाबाद) परमजित सिंग संधू (वय 42, रा. औरंगाबाद) व अनघा मोडक (वय 40, रा. वडगाव बुद्रुक) अशी आरोपींची नावे आहेत. दरम्यान, बँक खात्यांची माहिती चोरल्याप्रकरणी भाजपच्या चित्रपट आघाडीच्या शहराध्यक्षाला अटक करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या मुद्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोप होण्याचीही शक्यता आहे.

त्यांच्याकडून 11 मोबाईल फोन, रोख 25 लाख, दोन मोटारी, दुचाकी असा 43 लाख 54 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर व आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button