स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात वर्षा उसगावकर आणि हर्षदा खानविलकर यांचा रॉकिंग अंदाज
मुंबई : आपलं कुटुंब आपला सोहळा अर्थातच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. स्टार प्रवाह कुटुंबाच्या या कौतुक सोहळ्यात प्रेक्षकांच्या लाडक्या नंदिनी शिर्केपाटील आणि सौंदर्या इनामदार एकत्र थिरकताना दिसणार आहेत. नंदिनी शिर्केपाटील ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या वर्षा उसगावकर आणि सौंदर्या इनामदार म्हणजे अर्थातच हर्षदा खानविलकर पहिल्यांदाच एकत्र नृत्य सादर करणार आहेत. मालिकेमध्ये या दोघींचाही वेगळा थाट पाहायला मिळतो. मात्र स्टार प्रवाह परिवार पुरस्काराच्या निमित्ताने वर्षा उसगावकर आणि हर्षदा खानविलकर यांचा निराळा अंदाज पाहायला मिळणार आहे. एका धमाकेदार मराठी गाण्यावर जोशपूर्ण परफॉर्मन्स देत या दोन्ही तारकांनी सोहळ्याची रंगत द्विगुणीत केली आहे.
स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यातील या धमाकेदार नृत्याविष्काराबद्दल सांगताना वर्षा उसगावकर म्हणाल्या, ‘माझा आणि हर्षदाचा सोहळ्यामधील परफॉर्मन्स आमच्या चाहत्यांसाठी सुखद धक्का असणार आहे. हर्षदा एक उत्तम नृत्यांगना आहे. त्यामुळे तिच्यासोबत परफॉर्म करताना खुपच मजा आली. आमचे पेहरावही हटके आहेत. एरव्ही मालिकेमध्ये प्रेक्षक आम्हाला आमच्या व्यक्तिरेखेमध्ये बघत असतात. पण स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात आमचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तेव्हा नक्की पाहा स्टार प्रवाह परिवार पुरस्कार रविवार ४ एप्रिलला संध्याकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’