मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजप नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी किरीट सोमय्या यांच्यासह सुधीर मुनगंटीवार, मोहित कंबोज यांच्यावरही गंभीर आरोप केलाय. त्यात पत्राचाळ भूखंड प्रकरणाचाही समावेश आहे. राऊत यांनी केलेल्या आरोपांना मोहित कंबोज यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. संजय राऊत यांनी मोहित कंबोज यांना ओळखत नसल्याचा दावा केला होता. त्यावर बोलताना संजय राऊत हे आपल्या घरी आले होते आणि अनेक वर्षे ते गणपतीसाठी येतात, असं सांगत कंबोज यांनी राऊतांसोबतचा एक फोटोही दाखवला. इतकंच नाही तर राऊतांनी गरज भासल्यानंतर आपल्याकडे पैशांचीही मागणी केली होती, असा दावा करत कंबोज यांनी झालेल्या व्यवहाराचा दाखलाही ट्वीटरद्वारे दिला होता. त्यानंतर आता कंबोज यांनी राऊतांना उद्देशून ‘माझे पैसे परत कर’, असंही एक ट्विट केलं आहे.
राऊतांनी केलेल्या आरोपांवर बोलताना मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं होतं. ‘राऊतांनी सुरुवात केली की मोहित कंबोजला मी ओळखत नाही. ४ सप्टेंबर २०१७ ला राऊत माझ्या घरी आले होते. ते प्रत्येक वर्षी माझ्या घरी येतात. मी सांगू इच्छित नाही पण जीवनात अनेक वेळा त्यांनी माझ्याकडे पैशाबाबत मदत मागितली आणि मी त्यांची मदतही केली, असा दावा कंबोज यांनी केलाय. त्याचबरोबर कंबोज यांनी राऊतांना दिलेल्या पैशांचा व्यवहारही उघड केला होता. कंबोज यांनी ट्विटरवर पैशाच्या व्यवहाराचा पुरावाच दिला. यावर संजय राऊत यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. ते काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
राऊतांच्या टार्गेटवर असलेले अमोल काळे कोण आहेत?
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाआयटीत २५ हजार कोटींचा घोटाळा झाला होता. या प्रकरणातील अमोल काळे, ढवंगळे आणि इतर हे कुठे आहेत हे केंद्राला विचारू, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल म्हटलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. राऊत यांच्या आरोपामुळे अमोल काळे अचानक चर्चेतही आले होते. त्यातच राऊत, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी काळे परदेशात पळून गेल्याची शंका व्यक्त केली होती. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले गेले होते. तसेच काळेंचे देवेंद्र फडणवीसांशी कनेक्शन काय आहे असा सवालही या निमित्ताने केला जात होता. तसेच या घोटाळ्यामागे फडणवीसांचा आशीर्वाद आहे का? असेही तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, अमोल काळे यांनी स्वत: मीडियाला निवेदन देऊन सर्व आरोपांचं खंडन केलं आहे. परंतु, तरीही अमोल काळे कोण आहेत? असा प्रश्न अनुत्तरीतच होता.
अमोल काळे हे ४३ वर्षाचे आहेत. ते नागपूरचे रहिवासी आहेत. नागपूरच्या अभ्यंकर नगरात त्यांचे दोन टोलेजंग बंगले आहेत. ते कन्स्ट्रक्शन आणि आयटी विभागाशी संबंधित असल्याचं सांगितलं जातं. आता त्यांच्यावरील जे आरोप झाले आहेत तेही आयटी क्षेत्राशी निगडीतच आहेत. ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. तसेच तिरुमला तिरुपती समितीवर ते विशेष निमंत्रित सदस्य आहेत.
अमोल काळे हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. काळे हे फडणवीसांचे बालपणापासूनचे मित्रं आहेत. फडणवीस हे शनीचे भक्त आहेत. त्यामुळे ते नेहमी शनी देवाच्या दर्शनासाठी शनी शिंगणापूरला जात असतात. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर टाईम्स ऑफ इंडियात फडणवीसांच्या शनिभक्तीवर बातमी आली होती. त्यात अमोल काळे यांनी फडणवीसांच्या शनि भक्तीचा किस्सा सांगितला होता. फडणवीस आम्हाला नेहमी शनिशिंगणापूरला घेऊन जायचे. तासाभरात जाऊन येऊ असं सांगून ते आम्हाला न्यायचे, असं काळे यांनी म्हटलं आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये बाहेरच्या लोकांना संधी नसते. मात्र, २०१९ मध्ये काळे यांनी एमसीएच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक लढवली. तीही बाळ म्हादळकर गटाकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या शिफारशीवरूनच काळे यांना उपाध्यक्षपदाचं तिकीट मिळाल्याचं सांगितलं जातं. तसेच फडणवीस यांच्या शिफारशीवरूनच काळेंना तिरुमला तिरुपती संस्थेवर विशेष आमंत्रित सदस्य म्हणून घेतल्याचीही चर्चा आहे.
महाआयटी घोटाळ्यातील लोकांना पळवून लावलं आहे. एवढा मोठा घोटाळा आहे. या लोकांना मेहूल चोक्सी, नीरव मोदी आणि विजय मल्ल्याप्रमाणे पळवून लावलं आहे. महाआयटी घोटाळ्यातील काही प्रमुख लोकांना पळवून लावल्याची माझी माहिती आहे. अमोल काळे, ढवंगळे आणि इतर हे कुठे आहेत हे केंद्राला विचारू. २५ हजार कोटींचा हा घोटाळा आहे. त्याचे मनी लॉन्ड्रिंग झालं आहे. ईडी ऐकत असेल तर मी पुन्हा सांगत आहे. आम्ही हा घोटाळा बाहेर काढणार होतो, तेव्हाच ते पळून जाण्याच्या तयारीत होते, असं संजय राऊत यांनी सांगितलं होतं. एक दूधवाला महाराष्ट्रात येतो आणि ७ हजार कोटींचा घोटाळा करतो. कोण आहेत अमोल काळे? असा सवाल राऊतांनी केला होता.
याप्रकरणावर अमोल काळे यांनी खुलासा केला आहे. मी खासगी व्यावसायिक असून मुंबई क्रिकोट असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे. गेले दोन दिवस काही नेत्यांची माझ्या संदर्भातील वक्तव्य पाहण्यात आली. ही सर्व वक्तव्ये पूर्णत: दिशाभूल करणारी आणि माझी बदनामी करणारी आहेत. महाराष्ट्र शासनाचं मी कोणतंही कंत्राट घेतलेलं नाही. माझ्या खासगी व्यवसायाचे तपशील प्राप्तीकर विवरणात दिले आहेत. फक्त संभ्रम निर्माण करण्यासाठी माझी हेतू पुरस्सर बदनामी केली जात आहे. जे नेते माझी बदनामी करत आहेत, त्यांच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार आहे, असं अमोल काळे यांनी म्हटलं आहे.
नारायण राणेंनाही कुणी तरी ‘बॉय’ असेलच; गुलाबराव पाटलांचा टोला
शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपाचे किरीट सोमय्या यांच्यावर टीका केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दुसऱ्या दिवशी राऊत यांना फैलावर घेतले होते. यावर शिवसेनेचे फायरब्रँड मंत्री गुलाबराव पाटील यांनी राणेना टोला लगावला आहे.
राजकारणात प्रत्येकाला ‘बॉय’ असतोच, नारायण राणे यांना देखील कुणी तरी बॉय असेलच फक्त त्यांनी त्याचे नाव सांगावे, असा टोला लगावला आहे. तसेच किरीट सोमय्या हे सुशिक्षीत बेरोजगार राजकारणी असल्याची टीका देखील केली.
…ते कोकणात निवडणुकीत पडतात, उदय सामंतांचा राणेंना टोला
आता राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राणेंचं नाव न घेता जशास तसं उत्तर दिलं आहे. जे टीका करतात ते त्यांच्या कर्माचे. मी टीका करणारा मंत्री नाही. कुणावर टीकाही करत नाही. टीका करणाऱ्यांना मी उत्तरही देत नाही. टीका करत जे गाजावाजा करतात ते कोकणात निवडणुकीत पडतात, असं टोला उदय सामत यांनी राणेंचं नाव न घेता लगावला आहे. पिंपरी चिंचवड येथे आयपीएस कॅम्पसमध्ये आजोयित कार्यक्रमात ते बोलत होते.
सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणावेळी विद्यापीठास निधी मिळवून देऊ असं आश्वासन दिलं होतं. ४८ तासांच्या आत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अध्यासन केंद्रास ३ कोटी निधी देण्याचा ठराव मंत्रिमंडळात मंजूर करण्यात आला, असंही उदय सामंत यावेळी म्हणाले. नारायण राणेंवर टीका करताना उदय सामंत यांनी माझ्या विधानसभेत उभे राहून निवडून येऊन दाखवा असं खुलं आव्हान देखील उदय सामंत यांनी दिलं.