अर्थ-उद्योग

ठेवीदारांना मोदी सरकारचा धक्का; जवळपास सर्व बचत योजनांच्या व्याजदरात कपात

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्वसामान्य गुंतवणुकदारांना मोठा धक्का दिला आहे. 1 एप्रिलपासून पीपीएफसह (PPF) सगळ्या ठेवींवरील व्याजदरांमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. लहान बचत योजनांमध्ये पैसे लावणाऱ्यांसाठी नवीन आर्थिक वर्षाच्या सुरूवातीलाच एक वाईट बातमी आहे. हे नवीन दर १ एप्रिलपासून लागू होणार असून 30 जून 2021 पर्यंत लागू असतील. कोरोनाच्या संकटामुळे देशातली अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. सरकारच्या उत्पन्नाचा स्त्रोतही आटला आहे, त्यामुळे व्याजदरांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अर्थ मंत्रालयाने 2021-22 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये व्याजदराची यादी दिली आहे. अधिसूचनेनुसार बचत खात्यांवरील व्याजदरात 0.5% कपात करण्यात आली आहे. ते 4.0% वरून 3.5% वर करण्याची घोषणा केली गेली आहे. सुकन्या समृद्धि खाते योजने अंतर्गत उपलब्ध व्याज दर 7.6% वरून 6.9% करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याज दर 6.8 टक्क्यांवरून 5.9 टक्के करण्यात आला आहे.

सर्वात लोकप्रिय बचत योजना म्हणजे पीपीएफ योजनेच्या व्याजदरामध्ये कपात. या योजनेत मिळालेला व्याजदर कमी करण्यात आला असून तो 6.4 टक्के करण्यात आला आहे, जो सध्या 7.1 टक्के होता. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी बनविलेले ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याजदर 7.4 टक्क्यांवरून 6.5 टक्क्यांपर्यंत खाली करण्यात आले आहेत. तसेच किसान विकास पत्राचा व्याज दरही कमी करून 6.2 टक्के करण्यात आला आहे.

मुदत ठेवींवरील व्याज दरही कमी करण्यात आले आहेत. नव्या दरांनुसार एक वर्षाच्या मुदत ठेवींवर 4.4 टक्के, दोन वर्षांवर 5.0 टक्के, तीन वर्षांवर 5.1 टक्के आणि पाच वर्षांवर 5.8 टक्के निश्चित करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button