ल्यूपिनने केला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये प्रवेश

मुंबई : जागतिक पातळीवरील महत्वाची औषधनिर्माण कंपनी असलेल्या ल्यूपिन लिमिटेडने सर्वाधिक मोठे बुक सेन्टेन्स निर्माण करत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव नोंदवून नवा मापदंड प्रस्थापित केला आहे. ‘हार्ट रेट, इज इट अ मिसिंग लिंक?’ (पुस्तकाचे शीर्षक) या वाक्यातील अक्षरे दर्शविण्यासाठी ५००० पुस्तकांच्या प्रतींसह शीर्षक विकसीत करण्यात आले होते. लंडनच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या अधिकृत प्रतिनिधीच्या पर्यवेक्षणाखाली शिस्तबद्ध पद्धतीने पुस्तकांच्या हार्ड कॉपीज एकत्र करून हा वैशिष्ट्यपूर्ण विक्रम करणे शक्य झाले.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, स्ट्रोक आणि रक्तवाहिन्यांमधील दोषांमुळे निर्माण होणारे हृदय विकार यामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी एक पंचमांश मृत्यू भारतात होतात. हृदयाच्या गतीतील असुसंगतपणा वाढणे ही बहुतांश व्यक्तींमधील महत्वाची आरोग्य समस्या ठरत आहे. हृदयाची वाढलेली धडधड आणि त्यामुळे होणाऱ्या विकारावरील प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचार धोरणे याविषयी चर्चा करण्यासाठी आणि या जटील आरोग्य प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी ल्यूपिनने हा विक्रम करण्याचा प्रयत्न केला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या परीक्षकांकडून या विक्रमाची पाहणी झाली.
ल्यूपिन लिमिटेडचे इंडिया रिजन फॉर्म्यूलेशनचे अध्यक्ष राजीव सिबल यावेळी बोलताना म्हणाले, “हृदयाची धडधड आणि निरामय आरोग्याशी असलेला त्याचा संबंध याविषयी जागृती वाढविण्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या शीर्षकाची मदत होईल याचा आम्हांला आनंद वाटत आहे. रक्तदाब आणि रक्तातील साखर यांची तपासणी आता जगात सगळीकडे प्रचलित झाली आहे. असे असले तरी हृदयाची गती तपासणे हे चांगल्या आरोग्याचे एक महत्वाचे निर्देशक आहे. वैद्यकीय वर्तुळात हा मुद्दा पुढे आणणे याकडे आमचा प्रयत्न असून त्यासाठी भारतात तसेच परदेशात या तयार पुस्तकाचा उपयोग होऊ शकेल. या पुस्तकाच्या निर्मितीत आणि या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आमच्या प्रथितयश हृदयरोग तज्ञांचे आम्ही खूप ऋणी आहोत.”
देशभरातील ५०० हून अधिक डॉक्टरांशी अनेकदा प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर या पुस्तकाची संकल्पना आणि लेखन कार्यरत असणाऱ्या आठ प्रख्यात हृदयरोग तज्ञांनी केले असून त्यामध्ये डॉ.जे.सी.मोहन, डॉ.मोनोतोष पंजा, डॉ. आय. सत्यमूर्ती, डॉ.राजीव अगरवाल, डॉ.ब्रायन पिंटो, डॉ.सी.के.पोंडे, डॉ.ए.श्रीनिवास कुमार आणि डॉ.बी.के.महाला यांचा समावेश आहे. वाढलेली हृदयाची गती आणि अनेक प्रकारचे हृदयविषयक आजार यांच्यातील संबंध यात आहे. या विक्रमी कार्यक्रमाची भाग असलेली ५००० पुस्तके देशभरातील हृदयरोग तज्ञ आणि वैद्यकीय व्यावसायिक यांना वितरीत करण्यात येतील.