गोव्यात भाजपच्या बड्या नेत्याचे बंड; काँग्रेसच्या दिगंबर कामतांना पाठिंबा
आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचा तृणमूल काँग्रेसला धक्का

मडगाव : भाजप नेते भाई नायक यांनी उघडपणे आता बंडाचा पवित्रा घेतला असून, आपला पाठिंबा मडगावात दिगंबर कामत यांना असल्याचे सांगितले आहे. कामत यांना जिंकून आणूच, असेही ते म्हणाले. एका खासगी बहिणीकडे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाई हे भाजपचे मडगावातील एक ज्येष्ठ नेते असून, माजी मंत्री तथा मडगावचे माजी आमदार बाबू नायक यांचे ते चिरंजीव आहेत. मडगावातील अनेक सामाजिक संस्थेशीही ते संलग्नित आहेत. भाई यांच्या या भूमिकेमुळे आता भाजप पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतील, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. आपण अजूनही भाजप सोडली नाही, असेही नायक म्हणतात.
मडगावात २००५ सालापासून भाजपचा आमदार झालेला नाही. याची कदाचित दोन कारणे असावीत. एक तर कामत हे पॉवरफुल असावे वा भाजपकडे त्या ताकदीचा उमेदवार नसावा, असेही त्यांनी सांगितले. मडगावातून तीनदा कामत यांच्या विरोधात शर्मद पै. रायतूरकर व एकदा रुपेश महात्मे यांना उमेदवारी दिली. हे दोघेही पक्षनिष्ठ कार्यकर्ते आहेत. मडगावात भाजपचे कार्यकर्ते कमी व नेते जास्त अशी स्थिती आहे, असे नायक उद्गारले. भाजप चुकत आहे. मी पक्ष सोडलेला नाही, त्यांना नको असेल तर ठीक आहे, असेही ते म्हणाले.
डॉ. देशप्रभू देसाई यांना भाजपने उमेदवारी दिली होती. मात्र, त्यावेळी मंडळाला विश्वासातही घेतले गेले नाही. आपण वैयक्तिक कारणास्तव मंडळाच्या बैठकीला हजर राहू शकलो नाही. मात्र, बैठकीत दोन सदस्य बोलण्यास उभे राहिले असता त्यांना गप्प करण्यात आले. बाबू आजगावकर हे आमचे कौटुंबिक सदस्य आहेत. पेडणेत नको मडगावात उभे राहा, असे त्यांना पक्षाला सांगितले असावे. आपला पाठिंबा हा दिगंबर कामत यांना यापूर्वीच आपण जाहीर केलेला आहे. भाजप चुकला आहे, त्यासंबधी आपण कुठेही खुलेआम चर्चा करण्यास तयार आहे. आपण त्याला पेडणेत अपक्ष राहतो, का अन्य कुठल्या पक्षातर्फे उभा राहतो, यावर चर्चा करू.
आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचा तृणमूल काँग्रेसला धक्का; पुन्हा स्वगृही परतण्याची शक्यता
काँग्रेसचा राजीनामा देऊन अलिकडेच तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झालेले कुडतरीचे माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी रविवारी संध्याकाळी तृणमूल काँग्रेससह सर्वांना धक्का दिला आहे. ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी रविवारी संध्याकाळी कुडतरी येथे आपल्या निवासस्थानी आपले कार्यकर्ते व समर्थकांची बैठक घेतली. त्या बैठकीत तृणमूलला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी पुन्हा काँग्रेस जावे अथवा अपक्ष निवडणूक लढवावी. तृणमूलच्या तिकिटावर लढू नये, असे ठरले. त्यानंतर रेजिनाल्ड यांनी तृणमूलच्या सदस्यपदाचा राजीनामा प्रदेश अध्यक्षांना पाठवून दिला. मात्र राजीनामा पत्रात त्यांनी राजीनामा देण्यामागचे कारण स्पष्ट केलेले नाही.
दरम्यान, याबाबत प्रतिक्रीया देताना कुडतरीचे सरपंच मिलाग्रीस रॉड्रिग्ज म्हणाले की, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देताना पंचायत मंडळाला विश्वासात घेतले नव्हते. तसेच तृणमूल काँग्रेसचा राजीनामा देतानाही विश्वासात घेतलेले नाही. सोशल मीडिया तसेच लोकांकडून समजते की, रेजिनाल्ड स्वगृही परतणार आहे. आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स काँग्रेसचा राजीनामा दिल्याने कुडतरी काँग्रेस गट मंडळाने जिल्हा सदस्य मोरेनो रिबेलो, त्यांच्या पत्नी, शालोम सार्दीन व जोझेफ वाझ यांची नावें उमेदवारीसाठी प्रदेशाध्यक्षांकडे पाठविली आहेत. त्या चौघापैकी एकाला उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र आता रेजिनाल्ड पुन्हा कॉंग्रेसमध्ये आल्यास व त्याना उमेदवारी दिल्यास मतदार नाराज होउ शकतात असे मिलाग्रीस रॉड्रिग्ज यांनी सांगितले.
आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे तृणमूल काँग्रेसमध्ये गेले तरी या पक्षात ते खुश नव्हते. तृणमूलची कार्यपद्धत त्यांच्या अंगवळणी पडली नाही. त्यामुळेच त्यानी तृणमूल सोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच अलिकडेच भाजपतून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या उत्तर गोव्यातील एका राजकारण्याने रेजिनाल्ड यांना स्वगृही परतण्याचे तसेच काँग्रेसची उमेदवारी देण्याचे आश्वासन दिल्याने रेजिनाल्ड माघारी फिरले असावेत. अशी चर्चा कुडतरी मतदारसंघात सुरू आहे.