
लखनऊ : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी घटनेवरून योगी सरकार आणि मोदी सरकारविरोधात अद्यापही विरोधक आक्रमक असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने स्वतः दखल घेत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना योगी सरकारवर नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी अटक न झाल्याने शेतकरी नेते आक्रमक झाले असून, देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. यातच आता भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सूचक आणि महत्त्वाचे विधान केले असून, कायद्यासमोर सर्व समान आहे, दोषी आढळल्यास कारवाई होईलच, असे म्हटले आहे.
उत्तर प्रदेशचे गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याला शुक्रवारी क्राइम ब्रांच समोर उपस्थित राहायचे होते. मात्र, तो उपस्थित झाला नाही. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. योगी आणि मोदी सरकारसह भाजपवरही निशाणा साधला जात आहे. यावरून एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
कायद्यासमोर सर्वचजण सारखे आहेत. कायद्याच्या वर कुणीही नाही. दोषी आढळल्यावर कारवाई निश्चित होईल, असे नड्डा यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी ही घटना दुर्दैवी असून, यातील दोषींना पाठिशी घातले जाणार नाही. कठोर कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.
पुराव्याशिवाय कोणालाही अटक नाही; योगी आदित्यनाथ यांनी सोडले मौन
सर्वोच्च न्यायालयाने स्वतः दखल घेत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना योगी सरकारवर नाराजी व्यक्त केली. यातच आता या एकूणच प्रकरणावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मौन सोडले असून, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुराव्याशिवाय कोणालाही अटक करण्यात येणार नसल्याचे म्हटले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर प्रदेशमधील लखीमपूर जिल्ह्यात घडलेल्या घटनेवरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपवर विरोधकांकडून निशाणा साधण्यात येत आहे. शेतकरी नेत्यांनी योगी सरकारला इशारा देत, लखीमपूर खिरी प्रकरणी अटक करण्यात आली नाही, तर देशव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. एकूणच प्रकरणावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाष्य केले आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, लखीमपूर खिरी येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद आहे. सरकार या घटनेच्या मूळापर्यंत जात आहे. लोकशाहीत हिंसाचाराला कोणतेही स्थान नाही. सर्वांना सुरक्षित ठेवण्याची हमी कायद्याने दिली आहे. असे असताना कुणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. तसेच कोणत्याही दबावाखाली येऊन कोणतीही कारवाई केली जाणार नाही. पुराव्याशिवाय कोणालाही अटक केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.
विरोधकांना लखीमपूर घटनेतील पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेऊ न दिल्याबाबत बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, विरोधकांमध्ये असलेले मित्र सद्भावना दूत म्हणून तेथे जात नव्हते. त्यातील अनेक जण या हिंसाचारात सामील असल्याचा संशय होता. या घटनेतील तथ्य समोर आल्यावर चित्र स्पष्ट होईल. आम्ही दूध का दूध आणि पानी का पानी केल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार योगी आदित्यनाथ यांनी बोलून दाखवला.
विरोधी पक्षातील नेते हिंदू आणि शीख समुदायामध्ये मतभेद निर्माण करून शत्रूत्वाची दरी तयार करू पाहत आहेत. म्हणूनच डोळे उघडे ठेवून या सर्व गोष्टींकडे पाहा. विरोधकांच्या मागे लपलेला त्यांचा खरा चेहरा जनतेने पाहावा, असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी यावेळी केले. गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी याच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न सरकार करतेय का, यावर बोलताना ते म्हणाले की, कोणताही व्हिडिओ यासंदर्भातील नाही. आम्ही नंबर जाहीर केले आहेत. कुणाकडे पुरावे असतील, तर त्यांनी ते द्यावेत. कोणावरही अन्याय होणार नाही. मात्र, विरोधकांचा दबाव आहे म्हणून कारवाईही केली जाणार नाही, असे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.