मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं भाजपा विरुद्ध शिवसेना युद्ध आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. दिवसेंदिवस नवनवे आरोप-प्रत्यारोप सुरू असून भाजपाचे किरीट सोमय्या, नारायण राणे तर शिवसेनेकडून खासदार संजय राऊत गौप्यस्फोट करत आहेत. नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊतांच्या दाव्यांचा समाचार घेत राऊतांची कुंडली आपल्याकडे असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर खा. विनायक राऊत यांनी राणेंवर प्रतिहल्ला करत राणे आणि सोमय्या यांचं साटंलोटं असल्याचं म्हटलं होतं. आता राणे यांनी विनायक राऊत यांना प्रत्युत्तर देताना एक खळबळजनक खुलासाच केला आहे.
‘मातोश्री’वरील चौघांना ईडीकडून नोटीस धाडली जाणार असल्याची बातमी मिळाल्याचं नारायण राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. ‘खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी. लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करुन तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे, हत्या झाली. त्यांचीही चौकशी आता परत केली जाईल. एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळते’, असं ट्विट नारायण राणे यांनी केलं आहे. त्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे. नारायण राणे यांनी ट्विटमध्ये नमूद केलेले ‘मातोश्री’वरील ते चार जण कोण? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. तसंच नारायण राणे यांना ही माहिती कुणाच्या हवाल्यानं मिळाली अशीही चर्चा सुरू झाली आहे. ‘विनायक राऊत हे घडल्यावर आपले ‘बॉस’ आणि आपण कुठे धावणार?’, असा सवाल उपस्थित करत राणेंनी टीका देखील केली आहे.
विनायक राऊतांचे जोरदार प्रत्युत्तर
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेत नारायण राणेंच्या टीकांना प्रत्युत्तर दिलं होतं. विशेष म्हणजे यावेळी शिवसेनेकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’चा आधार घेत थेट किरट सोमय्यांचे व्हिडिओच पत्रकार परिषदेत दाखवले. एकेकाळी किरीट सोमय्यांनी नारायण राणेंच्या नावावर १०० बोगस कंपन्या असल्याचा आरोप केला होता. त्या आरोपांना घाबरुनच नारायण राणेंनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला.
विनायक राऊत यांनी यावेळी किरीट सोमय्यांचा एक जुना व्हिडिओ दाखवला. त्यात किरीट सोमय्या यांनी सध्याचे भाजपाचे नेते आणि मंत्री नारायण राणे यांच्यावर १०० बोगस कंपन्या असल्याचा आरोप केला होता. ईडीची चौकशी मागे लागेल म्हणूनच नारायण राणे यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असा खळबळजनक आरोप विनायक राऊत यांनी यावेळी केला आहे. राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खोटारडा असा उल्लेख नारायण राणे यांनी केल्याचा आणखी एक व्हिडिओ सादर केला. नरेंद्र मोदी हा एनडीएचा खोटारडा उमेदवार असल्याचं नारायण राणे म्हणाले होते असा व्हिडिओ विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दाखवला.
नितेश राणेंचा खोचक टोला
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्वीकृत संचालकपदी भाजप आ. नितेश राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निर्देशानुसार ही निवड करण्यात आली आहे. यावेळी दुसरे स्वीकृत संचालक म्हणून कुडळाचे प्रकाश मोरे यांची निवड करण्यात आली. यानंतर बोलताना नितेश राणे यांनी संजय राऊत यांनी मुंबईतील शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया दिली. संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेला मी पत्रकार परिषद म्हणणार नाही. ते एकतर्फी बोलले, अशी टीका नितेश राणे यांनी केली.
नितेश राणे यांनी संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा समाचार घेतला. योग्य माहिती आणि भूमिका समजते म्हणून पत्रकार परिषद महत्त्वाची असते. नुसते तुम्ही बोलता आणि पत्रकारांना प्रश्न-उत्तर करायला देत नाही. याला पत्रकार परिषद म्हणत नाही, याला नुसते भाषण म्हणतात. नारायण राणे यांनी खरी पत्रकार परिषद घेतली आणि सेना भवनमध्ये फक्त भाषण झाले. संजय राऊतांमध्ये हिंमत असती तर प्रश्न उत्तर घेतली असती, असा खोचक टोला नितेश राणे यांनी लगावला.
संजय राऊत स्वतः पत्रकार असून, पत्रकारांवर अन्याय करत असाल तर स्वतःच्या पेशाशी तुमची निष्ठा आहे का? असा सवालही नितेश राणेंनी केला. तसेच पोलीस आणि प्रशासन हे आदेशावर चालते. राज्यकर्ते आदेश देतात तसे ते चालतात. सत्ताधारी लोकांची मानसिकता काय याचे प्रतिबिंब पोलीस आणि प्रशासन यामध्ये दिसते. पोलीस आणि प्रशासनाला दोष देऊन फायदा नाही. याला जबाबदार सत्ताधारी आहेत, अशी टीकाही नितेश राणे यांनी केली.
विधानसभा सभागृहात भांडूनही नंतर विलासराव आणि राणेसाहेब एका डब्यात जेवायचे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. राजकारणाची पतळी घसरली आहे. ती चुकीची आहे, असे सांगत किरीट सोमय्या खरे किंवा खोटे बोलत असतील तर कागदपत्रांनुसार तुम्ही लढा ना. तुम्ही थांबवायचा का प्रयत्न करताय? तिथेच चोरी दिसते. काही दिवसांपूर्वी वरळीला मच्छीमार बांधवांना भेटायला जात होतो. तिथेही शिवसैनिक जमा झाले होते, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.