केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांचा राजीनामा; कर्नाटकच्या राज्यपालपदी नियुक्ती
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधीच विविध राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये कॅबिनेट मंत्री थावरचंद गेहलोत यांना मंत्रिपदावरून हटवून कर्नाटकचे राज्यपाल बनविण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हे आदेश दिले आहेत.
मिझोरामच्या राज्यपाल पदी हरि बाबू कमभमपति, मध्य प्रदेशच्या राज्यपालपदी मंगूभाई छगनभाई पटेल, हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मिझोरामचे सध्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांना गोव्याचे राज्यपाल, हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांना त्रिपुराचे राज्यपाल, त्रिपुराचे राज्यपाल रमेश बैस यांना झारखंडचे राज्यपाल, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांना हरियाणाच्या राज्यपालपदी नियुक्ती देण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री गेहलोत यांना हटविण्यात आले आहे.